लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव : रस्त्यावर एखादा अपघात झाल्यानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींचा जीव वाचविणाऱ्या सामान्य नागरिकांना, अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल ‘हायवे मृत्युंजय दूत’ म्हणून संबोधले जाणार आहे.
हायवेवर वा अन्यत्र कुठेही अपघात झाल्यास मदतकार्यासाठी धावणाऱ्यांच्या मागे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागणार नाही. उलट त्यांना बक्षीस मिळणार आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक व नागपूरचे माजी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून ‘मृत्युंजय दूत’ ही योजना अस्तित्वात येत आहे.
देशात महामार्गांवरील रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. नेमकी हीच बाब ओळखून अतिरिक्त पोलीस महासंचालक व नागपूरचे माजी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘मृत्युंजय दूत’ ही योजना आणली आहे. सर्व महामार्ग पोलीस केंद्र येथे ‘मृत्युंजय दूत’ योजना आज १ मार्चपासून सुरू होत आहे.
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील मॉल, पेट्रोलपंप, ढाबे, हॉटेल्समधील कर्मचारी, नागरिक, ठेलेवाले, ढाबेवाले, टायर रिमोल्डींग तसेच लहान-मोठे व्यवसाय करणारे विक्रेते असतात. कोणताही अपघात सर्वप्रथम हे पाहतात. तेव्हा सर्वप्रथम या विक्रेत्यांना ‘मृत्युंजय दूत’ होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. निवड झाल्यानंतर त्यांना रितसर प्रथमोपचार देण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना स्ट्रेचर तसेच प्रथमोपचार पेटी दिली जाणार आहे. चार-पाच ‘मृत्युंजय दूत’ यांचा एक गट तयार करून त्यांच्याकडे संबंधित केंद्रापासूनच्या किमान पाच-सहा गावांची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांना पोलीस विभागाकडून ‘मृत्युंजय दूत’ असे ओळखपत्र दिले जाणार आहे. अपघातस्थळापासून जवळचे दवाखाने, पोलीस ठाणे यांची माहिती व सर्व सर्वसंबंधितांचे मोबाईल क्रमांकही दिले जाणार आहेत.
चौकट:
या उपक्रमात चार-पाच जणांचा समूह तयार करण्यात येणार आहे. त्या गटास मृत्युंजय देवदूत या नावाने संबोधले जाणार आहे. खासगी-शासकीय हॉस्पिटलचे अधिकारी तसेच सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत या देवदूतांना जखमींवर प्रथमोपचार कसे करावेत, त्यांना कसे हाताळावे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देवदूतांच्या प्रत्येक समूहाला स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहित्यही देण्यात येईल. याशिवाय महामार्गांवरील हॉस्पिटलची नावे व त्यांचे संपर्क क्रमांकही देवदूतांकडे असतील. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका कुठे आहे, याबाबतची अद्यावत माहितीही देवदूतांकडे असणार आहे. याशिवाय यादीतील हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेच्या चालकांचे क्रमांकही या समूहाकडे देण्यात येतील.
- जगन्नाथ जानकर (पोलीस निरीक्षक)
म. पो. म, केंद्र,उजळाईवाडी
फोटो :संग्रहित अपघात फोटो घ्यावा