लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता सुनील आबासाहेब चव्हाण (वय ५४, रा. महावीर पार्क, सांगली) याला घरगुती वीज मीटर मंजुरीसाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी सायंकाळच्या सुमारास केली.
स्टेशन रोडवरील महावितरणच्या मुख्य कार्यालयात सुनील चव्हाण हा सहायक अभियंता म्हणून काम करतो. त्याच्याकडे इलेक्ट्रिक ठेकेदाराने एका घरगुती वीज ग्राहकाच्या वीज मीटर मंजुरीसाठी अर्ज केला होता. त्याला मंजुरी देण्यासाठी चव्हाण याने ठेकेदाराकडे सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पथकाने मागणीबाबत पडताळणी करून सायंकाळी कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी ठेकेदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारताना पथकाने चव्हाण याला रंगेहात पकडले. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, शरद पोरे, विकास माने, कृष्णात पाटील, मयूर देसाई आदींच्या पथकाने केली.
०३०३२०२१-आयसीएच-०४ - सुनील चव्हाण