कोल्हापूर : महावितरणने वीज वसुली व थकबाकीदारांची वीज जोडणी तोडण्याचा धडाका रविवारी सुट्टी दिवशीही कायम ठेवला. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक अशा १३३ ग्राहकांची वीज तोडण्यात आली. याचवेळी एका दिवसात ३ हजार ४४४ ग्राहकांनी २ कोटी २२ लाखांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला. दरम्यान, याविरोधात जनक्षोभही उसळू लागला असून, रविवारी मिरजकर तिकटी येथे नागरिकांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करुन पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाचे रणशिंग फुंकले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर लगेचच वीजबिल वसुलीवरील स्थगिती राज्य सरकारने उठवल्याने महावितरणने वसुली व वीज जोडणी तोडण्याची माेहीम जोरात हाती घेतली आहे. रोज शंभरहून अधिक जोडण्या तोडल्या जात असून, त्याप्रमाणात ग्राहकांकडून वीजबिलेही भरली जात आहेत. महावितरणकडून होत असलेल्या या सक्तीविरोधात सर्वसामान्य नागरिकांसह वीजबिल भरणार नाही कृती समितीदेखील आक्रमक झाली आहे. रविवारी संध्याकाळी अशोक भंडारी, सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली मिरजकर तिकटी येथे एकत्र येत नागरिकांनी महिलांच्या हस्ते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करुन शासनाविरोधात घोषणा दिल्या. वीजबिल कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही, असा एकमुखी निर्धारही यावेळी करण्यात आला.
चाैकट
रविवारी दिवसभरात घरगुतीचे ४८, वाणिज्यचे ८०, औद्योगिक ५ अशा एकूण १३३ ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली. घरगुतीच्या ३ हजार २६२ ग्राहकांनी १ कोटी ७२ लाख रुपये, वाणिज्यच्या १३८ ग्राहकांनी ३० लाख रुपये तर औद्योगिकच्या ४४ ग्राहकांनी २० लाख रुपये असा २ कोटी २२ लाखांच्या थकीत बिलांचा भरणा महावितरणकडे केला.
फोटो: १४०३२०२१-कोल-वीज बिल
फोटो ओळ : कोल्हापुरात रविवारी मिरजकर तिकटी येथे वीजबिल भरणार नाही कृती समितीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करुन वीजबिल वसुलीचा विरोध केला.