कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा प्रभावित झाला होता. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नौकानयन, तर काहींनी टायर ट्यूबद्वारे पोहून जात हा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत केला.
गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढेल तसे शहरातील बहुतांशी भागातील विजेच्या तारा तुटणे, रोहित्र बंद होणे, उपकेंद्रात पाणी घुसणे असे प्रकार घडले. त्यामुळे त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होते. तत्काळ महावितरणचे कर्मचारी त्या भागात पोहचता येत नसतानाही नौका किंवा टायर ट्यूबचा आधार घेत तेथपर्यंत पोहचत होते. तेथील दुरुस्ती केल्यानंतर त्या भागात पुराचे पाणी असून देखील वीजपुरवठा सुरळीत केला जात होता. त्यामुळे घरात जरी अडकलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. केवळ कर्तव्य भावनेतून महावितरणचे कर्मचारी जणू परिस्थितीशी दोन हात करीत होते. या कठीण परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी महावितरणेच पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे हेही दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. त्यांनी रविवारी शहरातील जलमय झालेल्या दुधाळी येथील उपकेंद्रास व हुपरी येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट देत मार्गदर्शनही केले. या कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता अंकुर कावळे, अधीक्षक अभियंता धर्मराज पोठकर मार्गदर्शन करीत होते.