कोल्हापूर : वायरिंग बदलण्याचे काम सुरू असताना तोच सिमेंटचा विजेचा खांब मोडून अंगावर पडल्याने महावितरणच्या लाईनमनचा मृत्यू झाल्याची दुर्घटना बुधवारी सायंकाळी जाधववाडीपैकी भोसलेवाडी येथे घडली. प्रकाश आनंदा भोसले (वय ३२, रा. उचत, ता. शाहूवाडी) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुराच्या पाण्यात हा सिमेंटचा खांब जीर्ण झाल्याने ही दुर्घटना घडली.पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश भोसले हे महावितरणमध्ये लाईनमन आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी त्यांची उचतहून कोल्हापूरला बदली झाली होती. जाधववाडीपैकी भोसलेवाडी परिसरात पुराच्या पाण्यामुळे जमीन भुसभुसीत होऊन अनेक विजेचे खांब वाकल्याने परिसरात विजेचा वारंवार व्यत्याय येत होता. गेले दोन दिवस या परिसरात विजेचे खांब सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे.
बुधवारी सायंकाळी एका सिमेंटच्या जीर्ण झालेला खांबावरील वायरिंग ओढून ते सुस्थितीत करण्याचे काम सुुरू होते. यासाठी प्रकाश भोसले हा लाईनमन खांबावर चढून वायरिंगचे काम करत होता. याचवेळी हा जीर्ण विजेचा खांब जमिनीतूनच मोडल्याने तो खांबासह खाली कोसळला. या खांबाखाली सापडल्याने प्रकाश गंभीर जखमी झाले. त्यांना तेथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, चार मुली असा परिवार आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरात महावितरणचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांच्या मृतदेहाचे रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयात विच्छेदन करून तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.लाईनमनकडून खांबावर वायरिंग दुरुस्तीचे काम?खांबावर चढून वायरिंग दुरुस्तीचे काम करण्याची जबाबदारी ही महावितरणच्या वायरमनची असते. पण प्रकाश भोसले हे लाईनमन असताना त्यांना खांबावर चढून वायरिंग दुरुस्तीचे काम कसे लावले? अशी चर्चा महावितरणच्या कर्मचाऱ्यांत सुरू होती.