कोल्हापूर : थकबाकीचा आकडा वाढत चालल्याने महावितरणने वसुलीसाठी ग्राहकांकडे आर्जव सुरू केले आहे. उद्योजकांकडे थकबाकीचा आकडा मोठा असल्याने गुरुवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसीत जाऊन उद्योजकांची भेट घेऊन बिले भरण्याचे आवाहन केले. शिरोलीतील स्मॅकच्या कार्यालयात महावितरणचे पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी उद्योजकांशी चर्चा केली. यावर सकारात्मक तोडगा काढू, असेही आश्वस्त केले.
शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या मोहनराव शिरगावकर सभागृहात गुरुवारी उद्याेजकांशी चर्चा करताना नाळे यांनी महावितरणच्या आर्थिक विवंचनेची वस्तुस्थिती स्पष्ट करून उद्योजकांनी थकीत व चालू वीज देयके भरून सहकार्य करावे, असे आवाहन केले. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत कारणमीमांसा करून आवश्यक उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली. या भागास वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या ११ केव्ही हाय-वे फिडरवर वाढीव भार येत असल्याने या फिडरवरील जयसिंगपूर विभागाचा अतिरिक्त भार नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या ३३/११ केव्ही टोप उपकेंद्रावर स्थलांतरित करण्याच्या सूचना नाळे यांनी दिल्या. या भार स्थलांतरणाचे काम पूर्णही करण्यात आले आहे. ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करून तत्पर व दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे उद्योजकांना आश्वस्त केले.
यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, कोल्हापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव गांधले, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष दीपक पाटील, खजानिस एम. वाय. पाटील, मानद सचिव जयदीप चौगले, संचालक श्यामसुंदर तोतला, प्रशांत शेळके, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आयटीआयचे अध्यक्ष राजू पाटील, फाँड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, शिरोली ॲन्ड रिक्लेमेशन प्लांटचे अध्यक्ष नीरज झंवर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
फोटो: १८०२२०२१-कोल-महावितरण
फोटो ओळ : महावितरणचे पुणे विभाग प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी गुरुवारी शिरोली येथे स्मॅकच्या कार्यालयात उद्योजकांची बैठक घेऊन थकीत वीज बिले भरण्याची विनंती केली.