कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकांना चावा घेतल्याने नागरिकांतून विशेषत: शेतकरी वर्गातून भीती निर्माण झाली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होईपर्यंत महावितरण कंपनीने कृषी पंपाला दिवसा वीज द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदिनाथ हेमगीरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
दत्तवाड, दानवाड, टाकळी परिसरात शेतामध्ये मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला आहे. त्यामध्ये शेतकर्यासह एका शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून भीती निर्माण झाली आहे. शेतीला आठवड्यातून तीन दिवस दिवसा, तर तीन दिवस रात्री वीज पुरवठा केला जातो. मोकाट कुत्र्यांची सध्या दहशत निर्माण झाल्याने शेतकरी पिकाला पाणी पाजविण्यासाठी रात्री जाणे शक्य नाही. परिणामी पाणी वेळेत पूर्ण होत नसल्याने पिकाच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.
वनविभाग व तालुका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येत आहे. मात्र, त्याला कालावधी लागत असल्याने ही मोहीम पूर्ण होईपर्यंत या परिसरातील शेतीला दिवसा वीज देऊन सहकार्य करण्याची मागणी पत्रकात केली आहे.