कोल्हापूर : ‘काळोख, पाऊस, महापुराचा वेढा असला तरी आपल्या घरातील उजेडासाठी आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू’ या कर्तव्यभावनेतून महावितरणचे कर्मचारी परिस्थितीशी दोन हात करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी झटत आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील विविध ठिकाणी वीज कर्मचारी जिवावर उदार होऊन युद्धपातळीवर ही लढाई लढत आहेत.
महे गावठाण फिडरच्या दुरुस्तीसाठी फुलेवाडीच्या आरे कक्षातील जनमित्र संदीप पाटील, विकास वरुटे, युवराज निकम यांनी साडेपाच तास पुराच्या पाण्यात काम करत नदीपात्र क्राॅसिंगच्या फिडरवरील उच्चदाब वीज वाहिनीची दुरुस्ती केली. महे गावठाण फिडरवरील ८ गावे व ४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे या गावांतील लोकांना मोठा दिलासा मिळाला. यातील करवीर तालुक्यातील आरे गाव तर शंभर टक्के स्थलांतरित झाले आहे. गावातील लोकांशी संपर्क साधण्यातही अडचणी येत होत्या.
बापरे..मध्यरात्री दीड वाजता काळोख केला दूर..
गडहिंग्लजला ३३ केव्ही एमआयडीसी वीज वाहिनीत बिघाड झाला होता. त्याचा वीजपुरवठा मध्यरात्री दीड वाजता पूर्ववत करण्यात यश आले. २४ जुलैला रात्री दहा वाजता मुमेवाडी उपकेंद्राने वीज वाहिनीत तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे कळविले. सहायक अभियंता श्रीपाद चिकोर्डे यांनी जनमित्रांसह वीज वाहिनीची गस्त सुरू केली. ३५ ते ४० वीजखांबाची पाहणी केल्यानंतर एका वीज वाहिनीची डिस्क फुटल्याचे लक्षात आले. पाऊस, चिखल, काळोख, शहरापासून दहा किलोमीटर दूर अंतर या प्रतिकूल परिस्थितीत सहायक अभियंता चिकोर्डे, अजित पोवार व जनमित्रांनी डिस्क बदलण्याचे काम पूर्ण केले. साडेतीन तासांच्या मेहनतीनंतर मध्यरात्री १ वाजून ३७ मिनिटांनी बिघाड दुरुस्त केला. त्यामुळे तीन उपकेंद्र, गडहिंग्लज एमआयडीसी व १६ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला.
नेसरीच्या हर्षद सुदर्शनेची जिवाची बाजी
नेसरीच्या तारेवाडी येथील नदीपात्रालगत असलेल्या राऊत डी. पी.जवळील वीजखांब पडल्याने ११ केव्ही हडलगे उच्चदाब वाहिनी तुटली होती. त्यामुळे लमानवाडा, डोणेवाडी व हडलगे गावातील घरांसह पोल्ट्री फार्मचा वीज पुरवठा बंद झाला. नेसरीच्या हर्षद सुदर्शनने जिवाची बाजी लावत पाण्यात पोहत जाऊन तांत्रिक दुरुस्तीचे काम सहकारी जनमित्रांच्या मदतीने पूर्ण केले.
अंकुश नाळे तळ ठोकून..
पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे हे २३ जुलैपासूनच कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. त्यांच्या उपस्थिती व मार्गदर्शनामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. आज त्यांनी कोल्हापूर शहरातील जलमय झालेल्या दुधाळी उपकेंद्रास भेट दिली. तेथील वस्तुस्थितीची पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.
(फोटो मेल केले आहेत)