कोल्हापूर : वीज बिल भरण्यावरून आंदोलने सुरू असतानाही आवाहन आणि दंडुका याचा एकाचवेळी वापर करीत महावितरणने कोल्हापूरकरांच्या खिशातून एका महिन्यात ७३ कोटी ५३ लाखांची रक्कम काढण्यात यश मिळविले आहे. अजून १८२ कोटी रुपयांच्या वसुली होणे बाकी आहे.
गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने एप्रिलपासून वीज बिलांचा भरणाच बंद झाला. जूनपासून काही प्रमाणात बिले देण्यास सुरुवात झाली; पण तोपर्यंत बिलांची वसुली करू नये, ही बिले माफ करावीत, अशी मागणी करणारी आंंदोलने सुरू झाली. सरकारनेही थंडपणाने घेत वसुली मोहीम फार ताकदीने राबविली नाही. जानेवारी महिना उजाडल्यावर मात्र महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला आल्याने वसुलीसाठी आवाहन सुरू केले. तरीही कोणी जुमानेना म्हणून अखेर १ एप्रिलपासून एक रुपयाचेही वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांची यादी तयार करून त्यांना नोटिसा पाठविल्या गेल्या.
हप्त्याने का असेना; पण बिल भरा, अशी विनंती करण्यात आली, त्यालाही फारसा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर फेब्रुवारीपासून वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात झाली. यालाही विरोध वाढू लागला तरी शासनाच्या पाठबळावर महावितरणने मोहीम सुरूच ठेवली. याचवेळी ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद देत थकबाकी भरण्यास सुरुवात केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील ४ लाख ६२ हजार २२२ ग्राहकांकडे २५५ कोटी ९६ लाखांची थकबाकी आहे. गेल्या महिनाभरात यातील ७१ हजार ५७४ ग्राहकांनी ७३ कोटी ५३ लाख रुपये भरले आहेत. अजूनही १८२ कोटी ४३ लाखांची वसुली करण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे.
चाैकट ०१
जिल्ह्यात ५४४० कनेक्शन तोडले
गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ५ हजार ४४० थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला. यात सर्वाधिक २८७० वीज कनेक्शन्स वाणिज्य विभागाची आहेत. घरगुती १५६३, तर औद्योगिक १००७ कनेक्शन्स तोडली आहेत.
चौकट ०२
वीज बिलांचा भरणा
ग्राहक प्रकार संख्या रक्कम
घरगुती : ६३ हजार ५०६ : ४१ कोटी ६९ लाख
वाणिज्य : ५ हजार ८८७ : १६ कोटी २३ लाख
औद्योगिक : २ हजार १८१ : १५ कोटी ६० लाख