कोल्हापूर : आधीच लॉकडाऊनमुळे मेटाकुटीस आलेल्या जनतेकडे थकलेली वीजबिले भरण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून आंदोलने सुरू आहेत. तरीदेखील महावितरणने वसुलीचा धडाका लावत बिले न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. आता त्यावर कळस म्हणून तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी ३०० ते ५०० रुपयांची पैशाची मागणी होत आहे. महावितरणकडून शोधून काढलेल्या भ्रष्टाचाराच्या या नव्या फंड्यामुळे जनतेत रोष निर्माण झाला आहे.वीज बिल भरणार नाही, कृती समितीने केलेल्या आवाहनामुळे बिले भरण्यास नागरिकांनी हात अखडता घेतला आहे. बिल न भरणाऱ्यांचे कनेक्शन तोडण्याची मोहीमच उघडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार हजारांवर कनेक्शन्स तोडली आहेत.
या सर्वांना रिकनेक्शन देणे ही महावितरणची जबाबदारी असताना, ३०० ते ४०० रुपयांची मागणी ग्राहकांकडून केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, तर हा सिस्टीममधूनच मेसेज येतो. त्यामुळे पैसे घ्यावे लागतात हे उत्तर दिले जात आहे.बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीची आंदोलनाची हाकमहावितरणकडून सुरू असलेल्या या अन्यायाविरोधात संघटितपणे आवाज उठवण्यासाठी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती पुढे आली आहे. किसन कल्याणकर, रामेश्वर पत्की, सतीश पोवार, राहुल चौधरी, गुरुदत्त म्हाडगुत, सुमित खानविलकर, प्रशांत बरगे, मुसा शेख, महादेव जाधव, अनिल कोळेकर, विजय जाधव यांनी कनेक्शन जोडायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले, तर संघटितपणे विरोध करा, असे आवाहन केले आहे.
एक तर वाढीव बिले आमच्या माथ्यावर मारली आहेत. ती भरली नाहीत, तर कनेक्शन तोडण्याचा दांडगावा केला जात आहे. हा सारासार अन्याय असून, कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना दिसतील तेथे घेरावो घालू, त्यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे, तेथे जाऊन काळे झेंडे दाखवू.-किसन कल्याणकर,संस्थापक, बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समिती
विजेचे कनेक्शन तोडले असल्याने महावितरणच्या नियमांनुसार तेथे कर्मचाऱ्याचा वापर होत असल्याने त्याचे चार्जेस आकारले जातात. घरगुती कनेक्शन तोडले असल्यास ३०० रुपये लेबर चार्जेस म्हणून आकारणी केली जाते. हा नियमच आहे, यात काही काळेबेरे अथवा भ्रष्टाचार नाही.-किशोर खोबरे,जनसंपर्क अधिकारी, महावितरण, कोल्हापूर परिमंडळ