कोल्हापूर : म्युकरमायकोसिसची लागण झाल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १८ जणांनी आपला एक डोळा गमावला आहे. तर एका रुग्णाचे दोन्ही डोळे गेले आहेत. तसेच सहा कोरोनाग्रस्तांचा गेल्या तीन दिवसांत मृत्यू झाला आहे. या वाढत्या संख्येमुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता आणखी वाढली आहे.गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली. नाकाच्या पाठीमागील बाजूस निर्माण होणारी काळी बुरशी वाढत जाऊन ती दृष्टीवर परिणाम करते. अशा रुग्णांवर उपचार सुरू असताना १८ जणांनी त्यांचा एक डोळा गमावला आहे. तर एका रुग्णाचे दोन्ही डोळे गेले असून त्याला अंधत्व आले आहे.तसेच लक्षणे असलेल्या सहा जणांचा गेल्या तीन दिवसांत मृत्यू झाला आहे. या सर्वांना कोरोनाची लागण झाली होती. मधुमेह आणि न्युमोनियाची लागण झाली होती. हे सर्वजण ऑक्सिजनवरच होते. त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची नोंद कोरोना मृत्यूत करण्यात आली.
मात्र शासनाने म्युकरची लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्यास या नोंदी कोरोनामुळे मृत्यू अशा न करता त्या म्युकरमुळे मृत्यू, अशा कराव्यात अशा सूचना दिल्यामुळे तशा नोंदी करण्यात आल्या आहेत. याआधीच या पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. म्युकरवरील इंजेक्शनचाही तुटवडा असून यामुळेही नातेवाईक हवालदिल झाले आहेत.मृतांमध्ये पाच पुरुषम्युकर कोरोनाग्रस्त मृत्यू पावलेल्या सहा जणांमध्ये पाच पुरुषांचा समावेश आहे. २८, ७२, ३९, ३९ आणि ५८ वय असलेल्या या पाच जणांचा मृत्यू झाला असून ५७ वर्षीय महिलेचा म्युकरमुळे मृत्यू झाला आहे. पाच मृत्यू हे सीपीआरमध्ये झाले असून सहावा मृत्यू हा हातकणंगले येथील खासगी रुग्णालयात झाला आहे.आतापर्यंत १४७ जणांना लागणआतापर्यंत जिल्ह्यात म्युकरमायकोसिसची १४७ जणांना लागण झाली होती. यातील २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी संपलेल्या २४ तासांत नवे ११ रुग्ण आढळले असून त्यातील चार जण सीपीआरमध्ये तर सात जण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत म्युकरची लागण झालेल्या १४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या १११ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील ७७ रुग्ण हे सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत.