कोल्हापूर : जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून, सध्या ७४ जणांवर उपचार सुरू आहेत. सीपीआरमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक असल्याने म्युकर रुग्णांसाठी १० बेड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली.सध्या सीपीआरमध्ये ४७ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील २० जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, अजून आठजणांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. कान, नाक, घसा विभागाच्या वॉर्डनंतर म्युकरच्या रुग्णांसाठी मानसोपचार विभागात २० बेडची सोय करण्यात आली होती.
मात्र म्युकर आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी जागा अपुरी पडू लागल्याने मानसोपचार विभागातून रुग्ण हलवून आता नेत्र विभागामध्ये ३० बेडची सोय करण्यात आली आहे; तर मानसोपचार विभागात कोरोनाच्या नियमित रुग्णांसाठी २० बेडची सोय करण्यात आली आहे.