कोल्हापूर : शहरातून वाहणाऱ्या जयंती नाल्यातील गाळ उपसण्याचे काम सुरू असून, गेल्या दोन दिवसांत शहाजी कॉलेजजवळील संप ॲन्ड पंप हाऊस येथील सुमारे दोनशे डंपर गाळ उपसण्यात आला.
दसरा चौकातील संप ॲन्ड पंप हाऊसजवळील बंधाऱ्यात अनेक महिन्यांपासून गाळ साचून राहिला होता. त्यामुळे जयंती नाल्यातील सांडपाणी काहीवेळा बंधाऱ्यावरुन थेट पंचगंगा नदीत मिसळत होते. काहीवेळा तांत्रिक कारणाने उपसा पंप बंद पडला की लगेच बंधाऱ्यावरुन पाणी वाहत होते. त्यामुळे ड्रेनेज विभागाने या बंधाऱ्याजवळील गाळ उपसण्याचा निर्णय घेतला होता.
दोन दिवसांत तेथील दोनशे डंपर गाळ बाहेर काढण्यात आला. बंधाऱ्यापासून शहाजी कॉलेजच्या मागील बाजूसही नाल्याच्या पात्रातील गाळ बाहेर काढण्यात येत आहे. बंधाऱ्याजवळ तसेच नाल्यातील सांडपाणी साठवण्याची क्षमता वाढविणे याच हेतूने हा गाळ काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. जर काही तास पंप बंद पडले, तर पाणी नदीत न मिसळता ते बंधाऱ्याला थांबावे, हाही हेतू आहे. बुधवारी हे काम पूर्ण झाले. जलअभियंता नारायण भोसले, सहायक अभियंता आर. के. पाटील, रामदास गायकवाड, कनिष्ठ अभियंता गुजर, रमेश कांबळे यावेळी उपस्थित होते.