लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुराच्या पाण्यामुळे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीत चिखलगुठ्ठा झाला आहे. सध्या नव्या इमारतीची स्वच्छता सुरू आहे. जुन्या इमारतीची साफसफाई आणि फर्निचर दुरुस्ती, विद्युत पुरवठा याची व्यवस्था करून पुढील आठवड्यातच हे कार्यालय सुरू होईल. तोपर्यंत जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना जिल्हा परिषदेतूनच कामकाज करावे लागणार आहे.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीत पाच फुटांच्या वर पाणी होते. येथे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे दालन, गावठाण, जमीन, आस्थापना, गृह विभाग या विभागातील कर्मचारी असतात. याशिवाय येथील शिवाजी सभागृह, सर्व सभा बैठका होतात ते ताराराणी सभागृह हा सगळा परिसर पाण्यात होता. मागील बाजूस असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे दालन व ग्रामपंचायत कार्यालय येथेही पाणी आले होते. गेले दोन दिवस या इमारतीचीच स्वच्छता सुरू आहे.
कर्मचाऱ्यांनी जुन्या इमारतीतील दप्तर वरच्या मजल्यावर हलवले होते. तर खुर्च्या, टेबलवर ठेवले होते. त्यामुळे हे नुकसान टाळता आले; पण फरशांवर तीन-चार इंचाचे चिखलाचे थर साचले आहेत. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाची अवस्था न बघण्यासारखी आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरामुळे खराब झालेल्या टेबलवर सनमाईक लावून त्यांचा पुनर्वापर करता आला. यावेळी पुन्हा ते तीन दिवस पाण्यात राहिल्याने फुगून तुकडे झाले आहेत. हे कार्यालय स्वच्छ करून विद्युत पुरवठा, टेबल, अन्य फर्निचर, संगणकाची जोडणी आणि दप्तर लावून पूर्ववत कामकाज सुरू व्हायला पुढील आठवडाच उजाडेल, अशी अवस्था आहे.
---