कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणासाठी वनविभागाची जमीन देण्याबाबतचा गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा ठराव एक आठवड्यात दिला जाईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी येथे दिली. ‘क्रिडाई कोल्हापूर’तर्फे आयोजित दालन प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात विमानसेवा, विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा चर्चेत आला. यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, विमानतळाच्या विस्तारीकरणात वनविभागाची जमीन घेणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित जमिनी देण्याबाबत गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने हरकत घेतली आहे. याबाबतचा ठराव त्यांनी वनविभागाला दिला आहे. त्यामुळे विस्तारीकरणात अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र सरकार देशातील छोट्या विमानतळांवर विमान उतरावे यासाठी विमान कंपन्यांना त्यांच्या तिकिटांवर काही टक्के अनुदान देण्याचा विचार करीत आहे. ही योजना केंद्राने राबविल्यास राज्य सरकारकडूनदेखील राबविली जाईल. त्यामुळे कोल्हापूरसाठी विमान सेवा सुरू होण्यासह विमानतळ विकासाला गती मिळेल. याबाबत खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापुरातून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी मुंबई, दिल्लीतील भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाचे अधिकारी, केंद्रीय मंत्री, आदींकडे पाठपुरावा केला. लो-कॉस्ट विमानतळामध्ये कोल्हापूरचा सहभाग झाला आहे. मात्र, विस्तारीकरणानंतरच विमानतळाच्या विकासाला गती मिळणार आहे. विस्तारीकरणात ९०० मीटरने रन-वे वाढविण्यासह नाईट लँडिंगची सुविधा करणे आवश्यक आहे. विस्तारीकरणासाठी वनविभागाची काही जागा संपादित करणे आवश्यक आहे. याबाबत वनविभागाची जमीन देण्याबाबत गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने काही कारणांमुळे हरकत घेतली आहे. त्याचे निरसन करून एका आठवड्यात या ग्रामपंचायतीकडून जमीन देण्याबाबतचा ठराव दिला जाईल. त्यानंतर वनविभागाने पुढील प्रस्ताव वेगाने वरिष्ठ कार्यालयाला सादर करावा. दरम्यान, गडमुडशिंंगी ग्रामपंचायतीचा सकारात्मक ठराव मिळाल्यास विमानतळ विस्तारीकरणातील अडचण सुटणार आहे. (प्रतिनिधी)भाषणाची तयारी... दालन प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास आमदार सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक एकाच व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमात भाषण करण्यासाठी काही मुद्दे नोंदविण्यात आमदार पाटील, खासदार महाडिक यांच्यासह आमदार हसन मुश्रीफ मग्न झाले होते.
मुडशिंगीचा ठराव आठवड्यात देणार
By admin | Published: January 29, 2016 11:07 PM