शिरोळ / जयसिंगपूर : शिरोळ तालुक्याला गुरुवारी पावसाने झोडपून काढले. तालुक्यात सरासरी ३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वैरणीचे शाळू पीक भुईसपाट झाले आहे. तर नद्यांमध्ये लालसर गढूळ पाणी आले असून नद्या तुडुंब भरून वाहत आहेत.
शिरोळ तालुक्यात नृसिंहवाडी ३९ मिलिमीटर, नांदणी ३६, जयसिंगपूर २८, शिरढोण ३८, कुरुंदवाड ४९, दत्तवाड २८, शिरोळ ५५ असे एकूण सरासरी ३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर अर्जुनवाड येथील राजेंद्र महाडिक यांच्या घरावर वीज कोसळल्याने घरातील पिठाची गिरण, इलेक्ट्रिक उपकरणे, टीव्ही संच असे एकूण दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असून, यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, शिरोळ येथील वैरणीचे शाळू पीक भुईसपाट झाले आहे. त्यामुळे ओल्या चाऱ्याच्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमध्ये दर नसल्याने त्यातच पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे पंचगंगा, दूधगंगा, वारणा व कृष्णा नद्यांना गढूळ पाणी आले आहे. त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरल्याचे चित्र दिसत आहे.
फोटो - ०४०६२०२१-जेएवाय-०१, ०२ फोटो ओळ - ०१) शिरोळ येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वैरणीचे शाळू पीक भुईसपाट झाले आहे. (छाया - सुभाष गुरव, शिरोळ) ०२) शिरोळ तालुक्यात गुरुवारी झालेल्या पावसामुळे नद्यांच्या पात्रात गढूळ पाणी आले आहे. (छाया - सुभाष गुरव, शिरोळ)