कोल्हापूर : सतेज पाटील व महादेवराव महाडिक यांच्यात समझोता करण्याचे आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न असफल ठरले. ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात शनिवारी भेटीसाठी गेलेले मुश्रीफ यांना महाडिक यांनी हुलकावणी दिल्याने चर्चा न करताच त्यांना परतावे लागले. सायंकाळी सात वाजता हसन मुश्रीफ यांच्या घरी मुश्रीफ, विनय कोरे, सतेज पाटील यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांना मिळाल्यानंतर महादेवराव महाडिक यांनी बंडखोरी केली. पाटील-महाडिक यांच्यात समेट घडविण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न सुरू केले होते. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील व धनंजय महाडिक यांच्यात समेट घडविण्याची किमया मुश्रीफ यांनी केली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत पाटील-महाडिक संघर्ष टोकाला जाईल, त्यातून जिल्ह्णाचे नुकसान होईल, यासाठी मुश्रीफ यांनी शुक्रवारी ड्रीम वर्ल्ड येथे झालेल्या मेळाव्यात मध्यस्थी करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी अकरा वाजता आमदार मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’ दूध संघाचे ताराबाई पार्क येथील कार्यालय गाठले. दारातच महाडिक व मुश्रीफ यांची भेट झाली; पण महाडिक यांनी गाडी न थांबविताच तेथून निघून गेले. त्यानंतर मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’च्या कार्यालयात बसून महाडिक यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला; पण तो होऊ शकला नाही. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सात वाजता आमदार मुश्रीफ यांच्या नागाळा पार्क येथील निवासस्थानी माजी मंत्री विनय कोरे आले. दहा ते पंधरा मिनिटांत सतेज पाटील यांनी हजेरी लावली. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर पाटील तेथून निघून गेले. त्यानंतर तास-दीड तास मुश्रीफ व कोरे यांच्यात चर्चा झाली. महादेवराव महाडिक यांची उमेदवारी व राजकीय घडामोडीवर बैठकीत चर्चा केली. यावेळी के. पी. पाटील, प्रा. जयंत पाटील, विजयसिंह जाधव उपस्थित होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अयोध्या टॉवर्स येथील वारणा कारखान्याच्या कार्यालयात उभय नेत्यांमध्ये पुन्हा बैठक झाली. यामध्ये निवडणुकीची रणनिती ठरवून आपापले मतदार कसे सांभाळायचे याबाबत चर्चा झाली. (प्रतिनिधी)
महाडिकांची मुश्रीफांना हुलकावणी
By admin | Published: December 13, 2015 1:27 AM