सदानंद औंधे --मिरज --राज्यात वैद्यकीय व्यवसायाशी संलग्न असलेल्या निमवैद्यकीय व्यावसायिकांच्या नोंदणीसाठी महाराष्ट्र निमवैद्यकीय परिषदेची स्थापना करण्यात येणार आहे. परिषदेच्या निर्मितीनंतर वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्र, किरणोपचार, किरणोत्सार तंत्रज्ञ, वधिरीकरण तंत्रज्ञान, आरोग्य निरीक्षक, पेशी तंत्रज्ञान यासह २१ प्रकारच्या निमवैद्यकीय तंत्रज्ञांना निमवैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करणे सक्तीचे होणार आहे. वैद्यकीय व्यवसायाशी संलग्न असलेले तंत्रज्ञ पदविका अभ्यासक्रम किंवा रूग्णालयातील अनुभवानंतर स्वतंत्र व्यवसाय सुरू करतात. एखाद्या व्यक्तीला रूग्णालय अथवा रक्तपेढी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे अधिकृत नोंदणी करावी लागते. मात्र रूग्ण उपचाराशी संबंधित असलेल्या निमवैद्यकीय व्यावसायिकांना कोणतीही नोंदणी करावी लागत नसल्याबद्दल आक्षेप होता. रूग्णाचा आजार निश्चित करण्यासाठी रूग्णाच्या रक्त, लघवीसह विविध तपासण्या करून तपासणी अहवालाच्या आधारे रूग्णांवर उपचार करण्यात येतात. रूग्णाच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या वैद्यकीय प्रयोगशाळा व अन्य निमवैद्यकीय व्यवसायासाठी निर्बंध व नियम नसल्याने अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याचा वैद्यकीय व्यावसायिकांचा आक्षेप आहे. पॅथॉलॉजी वैद्यकीय पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षण घेतलेले डॉक्टरच पॅथॉलॉजी प्रयोगशाळा सुरू करू शकतात. प्रयोगशाळा तंत्रज्ञ डिप्लोमा अथवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तीला तपासणी अहवाल देण्याचा अधिकार नसल्याच्या पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या तक्रारीमुळे न्यायालयाने खासगी प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर कारवाईचे आदेश आरोग्य विभागाला दिले होते. राज्यात डीएमएलटी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तंत्रज्ञांच्या सुमारे १० हजार वैद्यकीय प्रयोगशाळा सुरू आहेत. या प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या संघटनेने निमवैद्यकीय सेवा म्हणून मान्यता देण्याची शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार वैद्यकीय प्रयोगशाळेसह अन्य निमवैद्यकीय व्यवसायांच्या नोंदणीसाठी महाराष्ट्र निमवैद्यकीय परिषद कायदा २०१२ मध्ये विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत महाराष्ट्र निमवैद्यकीय परिषदेच्या निर्मितीसाठी येत्या अधिवेशनात विधेयक आणण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण संचालक, आरोग्य सेवा संचालक, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष व शासननियुक्त पाच सदस्य अशी परिषदेची रचना आहे. ही परिषद राज्यात निमवैद्यक व्यवसायींची नोंदणी व वर्तणुकीचे नियमन करणार आहे. परिषदेकडून भारतीय वैद्यक संस्थांकडून निमवैद्यकीय अर्हतांना मान्यता देण्यात येईल. परिषदेकडे नोंदणी केल्याशिवाय कोणालाही निमवैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही. नोंदणीशिवाय व्यवसाय करताना व नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचे आढळल्यास तीन ते दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. परिषदेस न्याय चौकशीसाठी दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत. निमवैद्यकीय व्यवसायांच्या नियमनासाठी परिषदेच्या निर्मितीमुळे गैरप्रकारांना प्रतिबंध होऊन वैद्यक व्यावसायिक व निमवैद्यकीय व्यावसायिकांतील संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र निमवैद्यकीय परिषदेच्या स्थापनेमुळे निमवैद्यकीय व्यावसायिकांच्या समस्या संपुष्टात येणार आहेत. नोंदणीच्या सक्तीमुळे योग्य प्रशिक्षण घेतलेले व अर्हता धारण करणारेच व्यवसाय करू शकणार आहेत. परिषद निर्मितीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. - अण्णासाहेब करोले, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ संघटनयांना करावी लागणार नोंदणी...प्रयोगशाळा तंत्रज्ञ, किरणोत्सार तंत्रज्ञ, किरणोपचार तंत्रज्ञ, हृदयचिकित्सा तंत्रज्ञ, मज्जातंतूशास्त्र तंत्रज्ञ, रक्तसंक्रमण तंत्रज्ञ, आॅप्टोमेट्री तंत्रज्ञ, पटलेप तंत्रज्ञ, बधिरीकरण तंत्रज्ञ, द्रवनिवेशन तंत्रज्ञ, न्यायसहायक विज्ञान, शस्त्रक्रियागार तंत्रज्ञ, वैद्यकीय प्रतिलेखन, पेशीतंत्रज्ञ, उतीरोगविज्ञान तंत्रज्ञ, पराधानऔषध तंत्रज्ञ, रुग्णीय मानसशास्त्रज्ञ, अंतर्दर्शन तंत्रज्ञ, कम्युनिटी मेडिसीन, आरोग्य निरीक्षक, आपत्कालीन उपचार तंत्रज्ञांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करावी लागणार आहे.
निमवैद्यकीय परिषदेच्या निर्मितीला मुहूर्त
By admin | Published: March 01, 2016 12:27 AM