कोल्हापूर : जुना बुधवार पेठ परिसरातील सांडपाणी पंचगंगा नदीत थेट मिसळते ही गंभीर बाब आहे, हे तुमच्या निदर्शनास कसे आले नाही. येथून पुढे प्रदूषणाबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. थेट कारवाई केली जाईल, अशा शब्दांत महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी महापालिकेच्या मुकादम, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना झापले.
आमदार चंद्रकांत जाधव यांनी आरोग्य विभागासंदर्भात बैठक घेतली. यावेळी त्यांनी मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आणले. बैठक झाल्यानंतर डॉ. बलकवडे यांनी तातडीने आरोग्य निरीक्षक, मुकादम आणि संबंधित कर्मचाऱ्यांची त्याच ठिकाणी बैठक घेतली,. याबाबत त्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. विभागप्रमुखांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर याची कल्पना का दिली नाही, अशीही त्यांनी विचारणा केली.
चौकट
एकमेकांकडे बोट करणे थांबवा
पंचगंगा प्रदूषणाबाबत दुर्लक्ष करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा प्रकार घडल्यास लेखी खुलासा करावा लागेल, असा इशाराही डॉ. बलकवडे यांनी दिला. यावेळी काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपला संबंध नसल्याचे म्हटले, यावर डॉ. बलकवडे आणखीन भडकल्या. एकमेकांकडे बोट करून बाजू काढून घेऊ नका; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही प्रशासक डॉ. बलकवडे यांनी ठणकावून सांगितले.