कोल्हापूर : महापालिकेच्या सोमवारी (दि. २३) होणाऱ्या हद्दवाढीसंदर्भातील विशेष महासभेतील निर्णयांची माहिती त्वरित शासनाला कळविली जाणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ नुसार नगर विकास विभागाने काढावयाची प्रारूप अधिसूचना तयार आहे. महासभेनंतर हद्दवाढीचा चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात जाणार आहे. यानंतर विशेष अधिकारात त्वरित निर्णय घ्यायचा की, लालफितीत भिजत ठेवायचा हे सर्वस्वी राज्यकर्त्यांवर अवलंबून आहे.कोल्हापूर शहरात प्रस्तावित सर्व १७ गावांचा समावेश करण्यास नगरविकास संचालकांनी हिरवा कंदील दर्शविला आहे. शहराची हद्दवाढ गरजेची असून, राज्य शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असा शेराही संचालकांनी अभिप्रायामध्ये दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने मागितलेल्या अभिप्राय हा सर्वस्वी महापालिक ा प्रशासनावर अवलंबून आहे. महसूल गावांचा समावेश, महसूल देणी, संबंधित गावांत पायाभूत सुविधा पुरविणे, आदी बाबी सोमवारच्या महासभेत मान्य करण्यात येतील. यामुळे महापालिकेची हद्दवाढीच्या दृष्टीने सर्व सकारात्मक बाजूने तयारी पूर्ण झाली आहे. पुणे हद्दवाढीचा अभ्यास करून त्या धर्तीवरच अधिकाऱ्यांनी कागदपत्रे रंगविली आहेत. त्यामुळे कागदपत्रांमध्ये त्रुटी निघण्याची शक्यता खूपच कमी आहे. हद्दवाढीच्या निर्णयात बाधित होणाऱ्या सर्व गावे व व्यक्तींना याची माहिती व्हावी यासाठी नगरविकास मंत्रालय अधिसूचना जाहीर करते. या अधिसूचनेद्वारे बाधित व्यक्तींच्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेतली जाते. दिलेल्या तारखेपर्यंत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (२) विचार करून शासनास अभिप्राय देतात. हद्दवाढीचा पहिला टप्पा समजली जाणारी ही अधिसूचना कशा स्वरूपाची असेल, याचा प्रारूप आराखडाही महापालिकेने तयार केला आहे. अधिसूचना जाहीर करण्याची तारीख फक्त बाकी आहे. (प्रतिनिधी)
हद्दवाढीची प्रारूप अधिसूचना तयार
By admin | Published: June 20, 2014 1:02 AM