अंजीर अफगाणिस्तानापासून पोर्तुगालपर्यंतच्या प्रदेशात आढळणारे पौष्टिक फळ. शरीरात कॅल्शियम आणि अँटिआॅक्साईड प्लाझा वाढविणारे फळ म्हणून अंजीर जगभरात प्रसिद्ध आहे. मध्यपूर्व आणि पश्चिम आशिया हे याचे मूळ स्थान असून, प्राचीनकाळापासून याचा वापर होत आहे. बद्धकोष्ठता,मधुमेहावर उपयोगी असणारे हे फळ खनिजतत्त्वाचे भांडार आहे, असे हे बहुगुणी अंजीर कसे आहे, ’लोकमत संगे जाणून घेऊ '.......सचिन भोसले -- कोल्हापूर --अंजीर हे फळ रोमन लोकांचे मुख्य खाद्य होते. अनादिकाळापासूनचा इतिहास असणाऱ्या अंजिराची लागवड अफगाणिस्तानापासून पोर्तुगालपर्यंत केली जाते. भारतातील पित्तोडगड परिसरात अंजीर पिकविला जातो. ओला आणि सुका अशा दोन्ही प्रकारांत हे फळ खाल्ले जाते. ओले अंजीर कमी काळ टिकते. त्यामुळे ते सुकविण्याकडे उत्पादकांचा जास्त कल असतो. सुके अंजीर मोठ्या प्रमाणात उपयोगात तसेच विक्रीस आणले जाते. सुक्या अंजिरापासून ‘फिग न्यूटन’ आणि ‘फिक रोल’ नावाची बिस्किटेही जगभरातील बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये सुक्या अंजिराचे सारण भरण्यात येते. याचबरोबर सुक्या अंजिराचा बहुतांश वापर लोक मेवा-मिठाईत करतात; तर अंजीर बासुंंदी, अंजीर बर्फीही तयार केली जाते. कोल्हापुरात दरमहा १४०० किलो इतका अंजीर अफगाणिस्तान येथून विक्रीसाठी येतो. तितकाच ते कोल्हापूरसह कोकणात खपतो. लग्नसराई आणि हिवाळ्यात याला मोठी मागणी असते. यात पोटॅशियम आणि कॅल्शियम जास्त असल्यामुळे हे फळ विविध आजारांवेळी उपयोगी ठरते. अंजिराची लागवड ही काही वर्षांपूर्वी केवळ मध्यपूर्व व पश्चिम आशियाई देशांत केली जात होती. मात्र, आता ती जगभरात केली जात आहे. फळांबरोबर अंजिराचे झाड शोभेचे म्हणूनही लावतात. या झाडाची उंची सुमारे ७ ते १० मीटर इतकी असते. अंजिराचे फळ आतून असंख्य बियांनी भरलेले असते. अंजीर कच्चे असताना हिरवे, तर पिकल्यानंतर जांभळट तपकिरी होते. अंजिराची लागवड कोरड्या व उष्ण वातावरणात होते. सर्वसाधारणपणे सुके अंजीर म्हणून जगभरात जे अंजीर येते, ते ‘ब्रेबा’ या नावाने प्रसिद्ध आहे. हिवाळा व पावसाळा यांच्या मध्यावर हे पीक घेतले जाते. अंजीर पिकविणाऱ्या देशांमध्ये तुर्कस्थान, इजिप्त, अल्जेरिया, अफगाणिस्तान, मोरोक्को, इराण, सीरिया, अमेरिका, ब्राझील, अल्बानिया, ट्युनिशिया हे देश आघाडीवर आहेत. बारमाही होतो अंजिराचा वापर -अंजीर ओले किंवा सुके दोन्ही प्रकारे खाल्ले जाते. अंजिरापासून जॅम बनविला जातो. ओले अंजीर जास्त काळ टिकत नसल्याने सुकवून त्याच्या माळा बनविल्या जातात. - बहुतांशवेळा अंजीर बारमाही बाजारात उपलब्ध असतो. अंजीर बासुंदी, आइस्क्रीम, मिठाई, आदींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. याशिवाय औषधी गुण असल्यामुळे हे फळ दररोज खाण्याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञ देतात. -यामध्ये भरपूर कॅल्शियम, अँटिआॅक्सिडंट्स असतात. ती रक्तामधील प्लाझ्मा अँटिआॅक्सिडंट्स वाढवण्यास मदत करतात. -याचबरोबर उष्णता कमी करणारा पदार्थ म्हणून जास्त दिवसांचा अंजीरही रुग्णांना खाण्यास दिला जातो.अंजिराचा वापर सध्या बासुंदी, आइस्क्रीम, बर्फी, जॅममध्ये होऊ लागला आहे. अंजिराच्या आकारानुसार त्याचा दर्जा ठरतो. मोठ्या आकाराच्या अंजिराच्या किलोचा भावही जास्त आहे. सर्वसामान्यपणे अंजीर हे उच्चभू्र लोकाचे फळ असा समज होता; पण शहरात आता अंजीर खाण्याबद्दल जागृती होत आहे. अंजीर जितका जुना तितके त्याच्यातील औषधी गुण वाढत जातात. त्यामुळे अशा अंजिराला आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून मागणी अधिक असते. लग्नसराई, हिवाळ्याच्या काळात अफगाणी अंजिराला मोठी मागणी होते. - चिंतन शहा, ड्रायफु्रट्स व्यापारी, कोल्हापूर सर्वसाधारण कडोला, ब्लॅक मिशन, ब्राउन टर्की, बु्रनस्वीक, सेलेस्टी या नावांचे अंजीर जगभरात पिकविली, सुकविली जातात आणि त्यानंतर विक्रीसाठी बाजारातही आणली जातात. तुर्की व अमेरिकेत कॅडूकस किंवा स्मिरना या जातींची अंजिरे पिकविली जातात. भारतात मार्सेलीज, ब्लॅक इस्चिया, पूना, बंगलोर आणि ब्राऊन टर्की अशा जाती आहेत.
‘बहुगुणी अंजीर’ पौष्टिकतत्त्वांचे भांडार
By admin | Published: November 17, 2014 12:07 AM