कोल्हापूर : मुंबई - बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळल्याने त्याचा येथील विकासाला मोठा फटका बसणार आहे. आम्ही सत्तेत असताना वीज दरवाढीच्या मुद्द्यावरून लढा उभारणारे कोल्हापूरचे उद्योजक हे कॉरिडॉरच्या प्रश्नाबाबत आता का शांत बसले आहेत, असा प्रश्न मला पडला आहे. या कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या सहभागासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत, असे अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. आमदार पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी या कॉरिडॉरमधील कोल्हापूरचा सहभाग महत्त्वाचा आहे. राज्यातील विजेचे दर अधिक असल्याच्या कारणावरून आम्ही सत्तेत असताना कोल्हापूरच्या उद्योजकांनी लढा उभारला. सकारात्मक निर्णयासाठी मी स्वत: त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती; पण यानंतर नवे सरकार आले. सरकार येऊन दीड वर्ष झाली तरी विजेचे दर काही कमी झालेले नाहीत. यातच आता भाजप सरकारने मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले आहे. त्याचा येथील औद्योगिक विकासाला मोठा फटका बसणार आहे. याबाबत मी आवाज उठविला; पण, अजूनही जिल्ह्णातील एकाही औद्योगिक संघटनेने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. शिवाय या संघटनेचे कोणतेही पदाधिकारी मला या प्रश्नाबाबत भेटायला आले नाहीत. औद्योगिक विकासाला मारक ठरणारा निर्णय असूनही उद्योजक अजूनही का शांत आहेत, हा मला प्रश्न पडला आहे. कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या सहभागासाठी माझे प्रयत्न सुरूच राहतील. पण व्यापारी, उद्योजक, आदी सर्व घटकांनी सामूहिकपणे आवाज उठवून सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.’ ते म्हणाले,‘या निर्णयाचा फटका कोल्हापूरच्या विकासावर दूरगामी होणार आहे. विकासाच्या सगळ््या प्रक्रियेतून कोल्हापूर बाजूला पडेल. कोल्हापूरला वगळले जाते आणि त्याचवेळेला सांगली,साताऱ्याचा समावेश केला जातो. कोल्हापूरात जागा उपलब्ध नाहीत असे तकलादू कारण दिले जाते. परंतू कोल्हापूरात अगोदरच चांगले औद्योगिक जाळे तयार झाले आहे. कॉरिडॉरमध्ये समावेश झाल्यास विमानतळ, रेल्वे सेवेचे विस्तारीकरण होईल. देशाच्या एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये या शहराला महत्व येईल. अगोदरच आपला स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेला नाही. आता कॉरिडॉरमधूनही बाजूला गेल्यास होणारे परिणाम गंभीर असतील. म्हणून सर्वच घटकांना त्याचे गांभीर्य वाटले पाहिजे.’ महानगरपालिकेचे मोबाईल अॅप आम्ही दिलेल्या वचननाम्यानुसार कोल्हापूरच्या विकासाला बळ देणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, शहरवासीयांना पाणी, रस्ते, आदी स्वरूपांतील चांगल्या सुविधा दिल्या जातील. याअंतर्गत लवकरच महापालिकेचे मोबाईल अॅप सुरू केले जाणार आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपक्रम, योजना राबविल्या जातील.(प्रतिनिधी)
मुंबई-बंगलोर कॉरिडॉर प्रश्नी उद्योजक शांत का?
By admin | Published: March 13, 2016 1:09 AM