कोल्हापूर : ट्रू जेट कंपनीच्या संकेतस्थळावर आॅनलाईन तिकीट नोंदणीची उपलब्धता दिसत नसल्याने ‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवेबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या कंपनीने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केल्याप्रमाणे अजून १० दिवस या मार्गावरील सेवा बंद राहणार आहे.मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू असून, त्यामुळे वेळापत्रकाचे पुनर्नियोजन करावे लागणार असल्याने, मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दि. ७ ते २७ डिसेंबरपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात येणार आहे.
दि. २८ डिसेंबरपासून पुन्हा सेवा सुरू करण्यात येईल, असे ट्रू जेट कंपनीचे कोल्हापुरातील व्यवस्थापक बी. रणजितकुमार यांनी विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कळविले होते. त्यानुसार सध्या सेवा तात्पुरती स्थगित आहे.
कंपनीने सेवास्थगितीची माहिती दिल्यानंतर काही दिवस २८ डिसेंबरपासून पुढील दिवसांसाठी आॅनलाईन तिकीट खरेदी, नोंदणीची सुविधा उपलब्ध असल्याचे संकेतस्थळ दाखवीत होते. मात्र, सध्या ही सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. त्याबाबत माहितीही मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ट्रू जेट कंपनीचे व्यवस्थापक बी. रणजितकुमार यांच्या मोबाईलवर दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी तो घेतला नाही.
तात्पुरती सेवा स्थगित झाल्यानंतरही ‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवेसाठी २८ डिसेंबरपासून पुढे आॅनलाईन तिकीट नोंदणी करण्याची सुविधा ट्रू जेट कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होती. सध्या मात्र ती दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.- बी. व्ही. वराडे, पर्यटनतज्ज्ञ