कोल्हापूर : मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू आहे; त्यामुळे वेळापत्रकाचे पुनर्नियोजन करावे लागणार असल्याने मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दि. ७ ते २७ डिसेंबरपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात येणार आहे. २१ दिवसांसाठी सेवा स्थगित राहणार आहे. शनिवार, दि. २८ डिसेंबरपासून पुन्हा सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती ट्रू-जेट कंपनीचे कोल्हापुरातील व्यवस्थापक बी. रणजितकुमार यांनी विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांना पत्राद्वारे दिली आहे.केंद्रसरकारच्या उडान योजनेअंतर्गत सप्टेंबरपासून मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाली. आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी सेवा पुरविण्यात येते. नोव्हेंबरअखेरपर्यंत या सेवेचा सुमारे ८ हजार प्रवाशांनी लाभ घेतला आहे. अहमदाबाद, जळगाव, मुंबईमार्गे कोल्हापूरमध्ये हे ७२ आसनी विमान येते. तेथून पुन्हा मुंबईला जाते; मात्र सध्या मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू आहे. त्याचा परिणाम या विमानसेवेच्या वेळापत्रकावर होत आहे. कोल्हापूरमध्ये हे विमान येण्यास दीड ते दोन तासांचा विलंब होत आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी कोल्हापुरातून मुंबईला जाणारे विमान हे अंधुक प्रकाशामुळे रद्द झाले होते. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी कंपनीकडून अहमदाबाद, जळगाव, मुंबई, कोल्हापूर मार्गावरील सेवेच्या वेळापत्रकाचे पुनर्नियोजन केले जात आहे. त्याबाबतचा निर्णय होईपर्यंत शनिवार, दि. ७ ते २७ डिसेंबर दरम्यान कोल्हापूर-मुंबई विमानसेवा तात्पुरती स्थगित केली आहे. या कालावधीतील तिकीट नोंदणी देखील बंद केली आहे.
मुंबई-कोल्हापूर विमानसेवा बंद होणार नाही. ही सेवा कंपनीसमोरील काही तांत्रिक कारणामुळे २१ दिवसांसाठी तात्पुरती स्थगित राहणार आहे. त्याबाबतची माहिती ट्रू-जेट कंपनीच्या व्यवस्थापकांनी मला पत्राद्वारे दिली आहे.- कमलकुमार कटारिया,संचालक, कोल्हापूर विमानतळ
या विमानसेवेला कोल्हापूर आणि मुंबईतील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे; त्यामुळे ती बंद होणार नाही. वेळापत्रकाच्या पुनर्नियोजनासाठी २१ दिवस ही सेवा तात्पुरती स्थगित केली आहे. २८ डिसेंबरपासून सेवा पूर्ववत सुरू होईल. तोपर्यंत प्रवाशांनी सहकार्य करावे.- बी. रणजितकुमार,व्यवस्थापक कोल्हापूर, ट्रू-जेट कंपनी
सुमारे ५५० जणांची तिकीट नोंदणीया विमानसेवेसाठी दि. ७ ते २७ डिसेंबरपर्यंत सुमारे ५५० जणांनी आधी तिकीट नोंदणी केल्याची शक्यता आहे. या प्रवाशांना सेवा स्थगित केली असून, तिकीटाचे पैसे परत देण्याबाबतचा संदेश कंपनीकडून एसएमएसद्वारे दिले असल्याची माहिती पर्यटनतज्ज्ञ बी. व्ही. वराडे यांनी दिली. ते म्हणाले, ‘दुपारची वेळ असली, तरी मुंबईला कमी वेळेत जाण्यासाठीचा चांगला पर्याय म्हणून त्याकडे प्रवासी पाहत होते. या सेवेला त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. तिकीटाचे पैसे जरी परत मिळणार असले, तरी पूर्वनियोजनात बदल करावा लागणार असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. कंपनीने फेरविचार करावा.‘आॅब्स्टॅकल लाईट’चे काम लवकर व्हावेनाईट लँडिंग सुविधेचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. आॅब्स्टॅकल लाईटअभावी काही काम अद्याप अपूर्ण आहे. ही लाईट बसविण्याचे काम राज्य सरकारकडून लवकर होण्याची गरज आहे. नाईट लँडिंग सुविधेमुळे सायंकाळी नंतरही कोल्हापुरात विमानाचे आगमन, उड्डाण होईल; त्यामुळे संबंधित सुविधा तातडीने सुरू होण्याची गरज आहे.
मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दृष्टिक्षेपात
- २७ आॅगस्ट २०१९ : तिकीट विक्री सुरू
- २८ आॅगस्ट : वेळेत बदल
- १ सप्टेंबर : विमानसेवा सुरू
- २५ नोव्हेंबर : तिकीट विक्री तात्पुरती स्थगित