संतोष मिठारीकोल्हापूर : कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली ‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू झाली. त्या दिवसापासून आजअखेर १३ दिवसांमध्ये एकूण १४०० जणांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, भाविक आणि पर्यटकांचा समावेश आहे.केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ट्रू-जेट कंपनीने ७० आसनी विमानाच्या माध्यमातून मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू केली. मुंबईहून दुपारी साडेबारा वाजता सुटणारे विमान कोल्हापुरात दीड वाजता येते. येथून दुपारी एक वाजून ५० वाजता निघणारे विमान मुंबईत दुपारी दोन वाजून ५० मिनिटांनी पोहोचते. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातील पाच दिवस ही सेवा सुरू आहे.
या विमानसेवेची वेळ दुपारची असली, तरी प्रवाशांचा तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोज सरासरी १०० जण ‘मुंबई-कोल्हापूर-मुंबई’ मार्गावर प्रवास करतात. त्यामध्ये ५० टक्के प्रवासी हे कोल्हापूरचे असून उर्वरित इचलकरंजी, सांगली, कऱ्हाड , सातारा, आदी परिसरांतील आहेत.
काही प्रवासी कोल्हापूरहून अहमदाबाद, इंदोर, हैदराबाद या राज्यांसह जपान, युरोपीयन देशांची कनेक्टिंग फ्लाईट घेत आहेत. तिरूपती-कोल्हापूर-हैदराबाद आणि हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गांवरील सेवांपाठोपाठ मुंबई-कोल्हापूर मार्गावरील सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाकडून प्रवासी आणि विमान कंपन्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.
‘पायलट बेस’ कोल्हापुरात करण्याचा विचारकोल्हापूरहून सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण १४०० जणांनी प्रवास केला आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. ‘मुंबई-कोल्हापूर-मुंबई’ मार्गावर रोज सरासरी शंभर जण प्रवास करतात. कोल्हापूरहून अन्य मार्गांवरील सेवाविस्तार करण्यासह या ठिकाणी कंपनीचा पायलट बेस करण्याचा विचार आहे. हा बेस झाल्यानंतर कोल्हापूरहून वैमानिक सेवा पुरविणार आहेत, असे कोल्हापूर विमानतळावरील ट्रू-जेट कंपनीचे व्यवस्थापक रणजितकुमार यांनी सांगितले.
‘मुंबई-कोल्हापूर’ विमानसेवा आवश्यक होती. ती सुरू झाली असून तिचा प्रवाशांना उपयोग होत आहे. या सेवेचा विस्तार होऊन आता मुंबईला सकाळी जाण्याची आणि तेथून सायंकाळी परत येण्यासाठीची दुहेरी विमानसेवा सुुरू व्हावी.- ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज.
सेवा सुरू करण्यापूर्वी कंपनीने रोज जितक्या प्रवाशांची अपेक्षा केली होती, तितके प्रवासी आहेत. कोल्हापूरहून देशभरासह जगातील विविध देशांसाठी कनेक्टिंग फ्लाईट घेणाऱ्यांचे प्रमाण चांगले आहे. तांत्रिक अडचणीमुळे एक-दोन दिवस वगळता ‘मुंबई-कोल्हापूर’ सेवा रोज नियमितपणे सुरू आहे.- बी. व्ही. वराडे, पर्यटनतज्ज्ञ
नाईट लँडिंगचे काम अंतिम टप्प्यातविमानतळावरील सध्याची धावपट्टी ९७० मीटरने वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. धावपट्टीच्या दोन्ही बाजूंच्या जमिनीचे सपाटीकरण, आॅब्स्टॅकल लाईटच्या सुविधेचे काम पूर्ण झाल्यानंतर नाईट लँडिंगच्या परवान्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. नाईट लँडिंग सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संबंधित काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी सांगितले.