सातारा : विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मुंबईतील मतदारांसाठी आतापासूनच आपली फिल्डिंग लावली आहे. सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळी आणि सातारा तालुक्यांतील मुंबईकरांसाठी पाचच दिवसांपूर्वी मेळावा घेतला. ‘कऱ्हाड दक्षिण’ विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावायला निघालेल्या डॉ. अतुल भोसले यांनीही मुंबई येथे मेळावा घेऊन आपली भूमिका मांडली आहे. सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, पाटण, सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघांतील लाखो मतदार नोकरी तसेच व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्य करून आहेत. कऱ्हाड दक्षिण, पाटण आणि सातारा विधानसभा मतदारसंघांतील बहुसंख्य मतदार उदरनिर्वाहासाठी मुंबईत तसेच आजूबाजूच्या उपनगरांत आहेत. परिणामी मुंबईतील मतदार अनेकांच्या विजयाला हातभार लावतो. यामध्ये माथाडी कामगार, कापड मार्केट आणि बेकरी व्यवसायात कामगार अधिक आहेत. त्यामुळे येथील मतदार नेहमीच प्रभावशाली ठरण्याबरोबरच अनेकांच्या विजयाला हातभार लावण्यास उपयुक्त ठरले आहेत.मुंबईमध्ये आजमितीस प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्त्यांची स्वतंत्र मंडळे असून, त्या कार्यक्रमांनाही इच्छुक उमेदवार आणि आमदार हजेरी लावू लागले आहेत. कोणत्या उपनगरात किती मतदान आहे, याचीही नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. आपले किती, विरोधक किती याचेही संकलन केले जाऊ लागले आहे.माण विधानसभा मतदार संघातील अनेक मतदार चांदीच्या कामानिमित्त चेन्नई आणि कर्नाटकमध्ये आहेत. त्यांच्यासाठीही येथील इच्छुक अनेकदा मेळावे घेतात. त्यांनीही येथे स्वतंत्र मंडळे स्थापन केली आहेत. त्याच्या वर्धापन दिन अथवा नवीन शाखा उद्घाटनासाठीही स्थानिक नेतेमंडळी अथवा आमदारांना बोलविले जाते. माणमधील अनेक मंडळी मुंबईत रंगकामगार आहे. म्हणूनच संबंधित इच्छुकांनी आतापासूच मुंबईतील मतदारांसाठी फिल्डिंग लावली आहे.(प्रतिनिधी)खर्चाचे गणित मुंबईतील मतदारांना मतदान आहे, तेथेपर्यंत आणणे आणि त्यांना पुन्हा मुंबईत सोडणे ही कामे खूप खर्चिक असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनांची अथवा ट्रॅव्हलसची व्यवस्था करावी लागते. त्याचा खर्च किती येईल, याचाही आराखडा बनविण्याची कामे आत्तापासून सुरुवात झाली आहेत.
साताऱ्याच्या नेत्यांची मुंबईत रणनीती
By admin | Published: July 25, 2014 9:48 PM