कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पुढील तीन दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला असल्याने महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी पत्रकारांना याबाबत माहिती देताना सांगितले की, शुक्रवार, शनिवार व रविववार असे तीन दिवस शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याच्या सूचना महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन समिती व सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पालिका प्रशासनाने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शहरातील ४७६ नाल्यांची शंभर टक्के स्वच्छता केली असून, जयंती, दुधाळी व शाम हौसिंग सोसायटीनजीकच्या नाल्यांतील गाळ व कचरा मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पंचगंगा नदीची पाण्याची पातळी किती फुटावर गेली की शहरातील कोणत्या भागात पुराचे पाणी जाणार आहे, याची माहिती आधीच काढून ठेवली असल्याने पूरपातळी वाढेल, तशी महापालिकेची पथके त्या-त्या भागातील नागरिकांना सावध करतील, असे बलकवडे यांना सांगितले. आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहितीही यावेळी देण्यात आली.
- बालिंगा उपसा केंद्राचे शिफ्टींग सुरु -
शहराच्या निम्म्या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा व नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशन शिफ्टींग करण्याचे काम सुरु झाले आहे. महापूर आला की उपसा केंद्र पाण्यात बुडतात आणि शहराचा पाणी पुरवठा बंद होतो. म्हणून हे शिफ्टींग सुरु आहे. जुलै अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. या कामावर दोन कोटी १४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, असे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी सांगितले.