कोल्हापूर : शहरातील व्यापारी सरसकट दुकाने सुरू करण्यासाठी आक्रमक झाल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. नियमबाह्य उघडलेल्या दुकानांवर कारवाई करण्याची तयारी इस्टेट विभागाच्या प्रशासनाने केली आहे. सोमवारी सकाळी राजारामपुरी, महाद्वार रोड, गुजरीत दुकान उघडण्यास इस्टेट विभागाच्या पथकाने जोरदार विरोध केला.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी न झाल्याने जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळून इतर दुकाने बंदच ठेवावे, असे सरकारचे आदेश आहेत. यासंबंधीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पण व्यापाऱ्यांना सरकार, प्रशासनाचे आदेश मान्य नाहीत. सरसकट दुकाने सुरू करण्याची मागणी महाद्वार रोड, राजारामपुरी, गुजरी परिसरातील व्यापाऱ्यांची आहे. चेंबर ऑफ कॉमर्सचीही अशीच मागणी आहे. यातूनच व्यापाऱ्यांनी सकाळी शहरात दुकाने उघडण्यास सुरुवात केली. या वेळी महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या सहा पथकातील १६ कर्मचारी दाखल झाले. यांनी दुकाने उघडण्यास विरोध केला. दुकान उघडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. यामुळे इस्टेट अधिकारी सचिन जाधव आणि व्यापाऱ्यांत वादावादी झाली. सरकारचेच आदेश असल्याने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी महापालिका प्रशासनाची सध्याची भूमिका आहे.
कोट
कोरोनाची रुग्णसंख्या कमी न झाल्याने सरकारच्या आदेशानुसार प्रशासनाने सरसकट दुकाने उघडण्यावर निर्बंध आणले आहेत. याची अंमलबजावणी महापालिका इस्टेट विभागाचे प्रशासन करीत आहे. निर्बंधाचे आदेश झुगारून उघलेल्या दुकानांवर कारवाई केली जाईल. प्रसंगी संबंधित दुकान सीलही केले जाईल.
-सचिन जाधव, इस्टेट अधिकारी, महापालिका