कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने २०२० वर्षाअखेरचा दिवस ‘नो व्हेईकल डे’ म्हणून साजरा करण्यात आला. प्रत्येक महिन्याचा अखेरचा दिवस नो व्हेईकल डे दिवस पाळण्याचा निर्णय यापूर्वीच महापालिकेने घेतला आहे.
गुरुवारी डिसेंबर महिन्याच्या अखेरच्यादिवशी महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकाने मोकळा श्वास घेतला. महापालिकेचे अधिकारी तसेच कर्मचारी सायकलवरुन, सार्वजनिक वाहनाने महापालिकेत कार्यालयीन कामाकाजासाठी आले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व सहायक आयुक्त संदीप घार्गे स्वत: घरापासून महापालिकेत सायकलवरून आले.
नो व्हेईकल डे मुळे शहरातील हवेचे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार असल्याने सर्वांनी महिन्याचा अखेरचा दिवस ‘नो व्हेईकल डे’ म्हणून पाळावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
नो व्हेईकल डे हा केवळ महापालिका अधिकारी, कर्मचारी पाळतात, शहरात त्यास प्रतिसाद मिळत नाही. अनेक कर्मचारी आपली वाहने घेऊन येतात; पण ती महापालिका इमारतीच्या बाहेर लावून चालत कार्यालयात जातात. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणि औसुक्य फारसे कोणाला राहिलेले नाही.