कोल्हापूर : नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने कोल्हापूर हे राज्यात सर्वांत पहिले प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून कुठेही प्लास्टिक दिसणार नाही, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, प्लास्टिक विके्रत्यांवर कडक कारवाई केली जाणार असून, शहरालगत असणाऱ्या गांधीनगर येथेही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. महापालिकेच्या मंगळवारच्या सभेमध्ये आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी प्लास्टिकमुक्त शहरातील कृती आराखड्याची माहिती पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनने दिली. यावेळी ते बोलत होते. महापौर निलोफर आजरेकर अध्यक्षस्थानी होत्या.
विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, सदस्य विजयसिंह खाडे-पाटील यांनी हागणदारीमुक्त शहराची घोषणा झाली. मात्र, वास्तव वेगळे आहे. त्यामुळे नुसत्या घोषणा नकोत; तर अंमलबजावणी व्हावी. प्लास्टिकमुक्तीसाठी सर्व सदस्य प्रशासनासोबतच असतील, असे सांगितले.
गटनेते सत्यजित कदम म्हणाले, शहरामध्ये २५ टक्के परिसरात ड्रेनेज लाईन नाही. मैला झूम येथील प्रकल्पाच्या ठिकाणी टाकला जात आहे. ड्रेनेज लाईनचा आराखडा तयार करावा. सदस्य किरण नकाते म्हणाले, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नरजवळील एका बोळात ई-कचरा व्यवसाय होत आहे. विद्युत उपकरणांमधील आवश्यक साहित्य काढून घेऊन तो कचरा बाहेर पाठविला जातो; तर स्क्रॅपचा ई-कचरा शेजारील नाल्यात टाकला जात असून संबंधितांवर धाड टाकून कारवाई करावी.आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले
- प्लास्टिकमुक्तीसाठी नगरसेवकांनी प्रभागात जनजागृती, प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यावेत.
- प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाईवेळी नगरसेवकांचा दबाव नको.
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोल्हापूरसाठी दोन कोटींचा निधी देणार
- जिद्दीने, ताकदीने शहर प्लास्टिकमुक्त करू.
- प्लास्टिकमुक्तीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये स्पर्धा
- १९२ विके्रत्यांवर कारवाई, नऊ लाख ७० हजारांचा दंड वसूल, दोन टन प्लास्टिक जप्त.