कोल्हापूर : महापालिकेने गुरुवारी ताराबाई रोडवरील ५४ बेकायदेशीर केबिन हटवल्या. तणावपूर्ण वातावरणातच कारवाई झाली. बहुतांशी जणांनी स्वत:हून केबिन काढून घेतल्या तर काहींच्या केबिनांवर हातोडा टाकण्यात आला. यावेळी किरकोळ वादावादीचा प्रकारही घडला.महापालिका प्रशासन गेल्या चार दिवसांपासून ताराबाई रोडवरील अतिक्रमणांवर कारवाईसाठी ठाण मांडून आहे. कपिलतीर्थ मार्केट ते रंकाळा मार्गावरील गुरुवारी बेकायदेशीर केबिनवर कारवाई करण्यास सुरू केले. सकाळी १० वाजताच येथे पोलिसांसह महापालिकेचा फौजफाटा दाखल झाला. त्यानंतर तणावपूर्ण वातावरणात केबिन हटविण्यात आल्या.
काहींनी साहित्याची तोडफोड होऊ नये म्हणून स्वत:हून केबिन काढून घेतल्या. महालक्ष्मी अन्नछत्र परिसरातील साडीची विक्री करणाऱ्यांची छपरी जेसीबीच्या सहायाने काढली. यानंतर महालक्ष्मी मार्केट येथील केबिन हटविण्यात आल्या. साकोली कॉर्नर, दयावान ग्रुप परिसरात पत्र्याचे शेडच्या मोठ्या केबिन संबंधितांनी स्वत:हून हटवल्या.कपिलतीर्थ मार्केटमधील केबिनवर हातोडामित्रप्रेम मित्रमंडळासमोरील रिक्षा स्टॉप येथून कपिलतीर्थ मार्केटमध्ये प्रवेशद्वारात सात ते आठ फळ विक्रेत्यांनी हातगाडीऐवजी केबिन लावून व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. त्यांच्यावर गुरुवारी कारवाई करण्यात आली. महापालिका कर्मचारी आणि त्यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. फेरीवाला कृती समितीच्या नेत्यांनी त्यांना तेथेच केबिन ठेवा, असे सांगितले. दुपारनंतरही केबिन तेथेच असल्याच्या आढळून आल्यानंतर अतिक्रमण निर्मुलन पथकाचे प्रमुख पंडित पवार त्यांच्यावर भडकले. येथे केबिन लावू देणार नाही, असे ठणकावून त्यांना सांगितले.