कोल्हापूर : वैद्यकिय सुविधा देण्याच्या बाबतीत एक महत्वपूर्ण टप्पा गाठणाऱ्या महानगरपालिकेने दहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सीजन प्लँट जोडण्याच्या कामास रविवारपासून सुरुवात केली. नेहरूनगरातील आयसोलेशन रुग्णालयाच्या आवारात हा प्लांट उभारला जात आहे.एखादे संकट आले की त्यातून काही तरी चांगले घडते असा समज आहे. तो तंतोतंत खरा ठरणारा प्रकार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या बाबतीत घडला आहे. दीड वर्षापूर्वी बंद पडत चाललेले आयसोलेशन रुग्णालयाचे कोरोना महामारीच्या संकटात भाग्य उजाडले आणि त्याचे रूपडेच पालटले. या रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू झाला. तेथे सहा व्हेंटिलेटर्स जोडण्यात आले. जादा ७० बेडचे रुग्णालय सुरू करण्यात आले. तेथील मोडकळीस आलेल्या खोल्यांची दुरुस्ती झाली. रंगरंगोटी झाली.आता तर त्याठिकाणी दहा हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी उभारली जात आहे. सुमारे ८० लाख रुपये खर्च करून ऑक्सिजन टाकीचे काम हाती घेतले आहे. अहमदाबादहून टाकीचे साहित्य आल्यानंतर रविवारी दिवसभर सुट्टी असूनही टाकी जोडण्याचे काम सुरू होते. कोल्हापुरातील संगीता कन्स्ट्रक्शन यांना हे काम देण्यात आले असून त्यांनी अहमदाबादच्या एअर ॲन्ड गॅस कंपनीकडून टाकीचे सर्व साहित्य आणले आहे.ज्या ठिकाणी टाकी बसविण्यात येत आहे, तेथील सर्व सिव्हील वर्क आधीच पूर्ण करून घेण्यात आले आहे. टाकीपासून रुग्णालयापर्यंत पाईपलाईन टाकणे, शेड उभारणे तसेच इलेक्ट्रिक जोडणीचे काम बाकी असून ते आठ दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर ऑक्सिजन प्लांट सुरू केला जाईल.दहा हजार लिटर क्षमतेचा हा प्लांट असून त्यासाठी ८० लाख रुपये खर्च आला आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी महापालिकेला ऑक्सिजन विकत घ्यावा लागत होता, आता आपली गरज भागवून दुसऱ्या रुग्णालयांना देण्याचीही पालिकेची तयारी असेल. कोरोनाच्या काळात पालिकेने आपल्या वैद्यकीय सेवा सुविधात बऱ्याच प्रमाणात सुधारणा केली आहे.
महापालिकेतर्फे ऑक्सिजन प्लांट जोडण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 12:32 PM
CoronaVIrus Hospital Kolhapur : वैद्यकिय सुविधा देण्याच्या बाबतीत एक महत्वपूर्ण टप्पा गाठणाऱ्या महानगरपालिकेने दहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सीजन प्लँट जोडण्याच्या कामास रविवारपासून सुरुवात केली. नेहरूनगरातील आयसोलेशन रुग्णालयाच्या आवारात हा प्लांट उभारला जात आहे.
ठळक मुद्देमहापालिकेतर्फे ऑक्सिजन प्लांट जोडण्यास सुरुवात दहा हजार लिटर क्षमतेची टाकी : आठ दिवसांत कार्यान्वीत