कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्यांचे काम पूर्ण झाले असून त्या राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात आल्या. आयोगाकडून सूचना येताच या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. सुमारे एक हजार ८०० हरकती प्राप्त झाल्यामुळे या याद्यांबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक केव्हा होणार आहे याबाबत कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली असतानाच महापालिका प्रशासन मात्र आयोगाच्याच सूचनेनुसार प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याच्या कामात गेले काही दिवस व्यस्त होते. शुक्रवारी शहरातील ८१ प्रभागांच्या अंतिम मतदार याद्या तयार करून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अहवालासह आयोगास पाठविण्यात आल्या.
आता निवडणूक आयोगाकडून काय सूुचना येतात याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख आयोगाकडून कळविण्यात येणार आहे. त्यामुळे या तारखेकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रशासक बलकवडे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अंतिम याद्या तयार करताना प्राप्त झालेल्या हरकतींचे योग्य निराकरण झाले आहे का, आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत का याची खात्री पुन्हा एकदा करून घ्यावी, असे सांगितले आहे. त्यामुळे सर्वच कर्मचारी पुन्हा एकदा खात्री करून घेत आहेत.
यादीत चुका का झाल्या?
महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय याद्या तयार करताना प्रत्यक्ष जागेवर न जाता ब्लॉकनिहाय फोडल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाले. सुरुवातीलाच जागेवर जाऊन जर अधिकाऱ्यांनी घरनंबर, गल्ली, कॉलनी, प्रभाग विभागणारे मुख्य रस्ते याची खातरजमा केली असती तर या चुका कमी प्रमाणात झाल्या असत्या, पण अधिकाऱ्यांची बेफिकीरी नडली. काही ठरावीक अधिकारी, कर्मचारी यांच्या चुका मात्र नंतर संपूर्ण प्रशासनाला भोगाव्या लागल्या. सर्वच अधिकारी काही रात्री जागून मतदार याद्या दुरुस्त करण्याचे काम करत होते.