कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणारी शहरातील पाच हॉटेल्स व बारा मंगल कार्यालयांवर महानगरपालिकेच्या भरारी पथकाने कारवाई करुन दंड ठोठावला. तसेच एक मंगल कार्यालय सील करुन वधूचे पिता, वराचा भाऊ व मंगल कार्यालयाचे मालक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.
मंगळवारपेठेतील मंगेशकर नगर येथील अक्षय अरुण जाधव यांना श्रीकृष्ण सरस्वती मंगल कार्यालय लग्नाचे कार्यक्रमाला २५ जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलेली होती. याठिकाणी महानगरपालिकेच्या भरारी पथकाकडून कार्यक्रमाचे ठिकाणी तपासणी केली असता, लग्नकार्याला २५पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याचे पथकाला आढळून आले. त्याचबरोबर कोविडच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचे नियम पाळलेले जात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी अक्षय अरुण जाधव यांना कार्यालयातील लोकांनी सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर केला नसल्याने दोन हजारांची दंडात्मक कारवाई केली. तसेच संजय प्रभाकर जरग, विजय पोवार, अक्षय जाधव यांच्याविरुध्द रविवारी रात्री गुन्हा दाखल केला.
शहरातील लग्न समारंभ आयोजित केलेल्या पाच हॉटेल्स, बारा मंगल कार्यालयांवर विनामास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने दंड केला. ही कारवाई उपमुख्य अग्निशामक तानाजी कवाळे, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, परवाना अधीक्षक राम काटकर, आरोग्य निरीक्षक गीता लखन, राजेंद्र पाटील, दयानंद मोरे, दिलीप कदम यांनी केली.