कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर लढविण्याचा निर्णय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाचे शहर चिटणीस बाबूराव कदम होते.
बाबूराव कदम म्हणाले, महापालिकेची निवडणूक मार्च-एप्रिलमध्ये होत आहे. सत्ताधारी मंडळींनी तयारी सुरू केली असली, तरी कोल्हापूरकरांच्या ज्वलंत प्रश्नांचा त्यांना विसर पडला आहे. बेगडी समाजकार्य करणारी मंडळी पुन्हा पुढे येत आहेत. या प्रवृत्तीला बाजूला करण्यासाठी ‘शेकाप’ स्वबळावर रिंगणात उतणार आहे. या निवडणुकीत निष्ठावंत व विचाराने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, असा सर्वानुमते ठराव बैठकीत करण्यात आला.
यावेळी संभाजी जगदाळे, संग्राम माने, विजय लोंढे, राजाराम धनवडे, मोहन पाटील, दिलीपकुमार जाधव, सुभाष सावंत, राजेंद्र कोतमिरे, मधुकर हरेल, आशिष चिले, शीतल पोहाळकर, राजश्री सावंत आदी उपस्थित होते.