कोल्हापूर : घरगुती गणपती विसर्जन व अनंतचतुर्दशीदिवशी दान केलेल्या गणेशमूर्ती तसेच निर्माल्य नियोजित ठिकाणी विसर्जित करण्यासाठी महापालिका २२० ट्रॅक्टर भाड्याने घेणार आहे. वर्कशॉप विभागाने तशी निविदाही प्रसिद्ध केली आहे.कोल्हापूर शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पंचगंगा नदी, रंकाळा तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून महापालिका प्रशासन दरवर्षी गणेशमूर्ती व निर्माल्य दान करण्याचे आवाहन करते. यासाठी शहरात ठिकठिकाणी विसर्जन कुंड उभारले जातात.
घरगुती गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशीदिवशी महापालिकेकडून दान केलेल्या मूर्ती संकलित करून इराणी खण येथे विसर्जित केल्या जातात; तर निर्माल्य अवनि, एकटी या संस्थांकडे खतनिर्मिती प्रकल्पासाठी देते.शहरातील विसर्जन कुंड, पंचगंगा नदी, रंकाळा तलाव येथे संकलित झालेल्या मूर्ती, निर्माल्य विसर्जन ठिकाणी नेण्याकरिता दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महापालिकेने २२० ट्रॅक्टर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्कशॉप विभागाकडून याची निविदाही प्रसिद्ध केली आहे.