कोल्हापूर : शहरातील कोरोना संसर्ग तीव्र वेगाने वाढत चालला असून भविष्यकाळात रुग्णांकरिता बेड कमी पडू नयेत म्हणून महानगरपालिकेच्या वतीने आणखी साडेतीनशे बेडने क्षमता वाढविली जाणार आहे. प्रामुख्याने सर्वच बेड हे ऑक्सिजनयुक्त असतील तसेच लहान मुलांकरिता त्यापैकी १०० बेड राखीव असतील.
रोज नवीन अडीचशे ते तीनशे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी तर ६४७ इतके विक्रमी रुग्ण आढळून आले. त्यामुळे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना नियंत्रित कसा आणायचा, हा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर आहे.
राज्य सरकारच्या सूचनेनुसार कोरोनाबाधित सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरीच उपचार घेण्यास मान्यता देण्यात आली असल्यामुळे आतापर्यंत तरी बेड मिळत नाही अशा तक्रारी फारशा आलेल्या नाहीत. बेड उपलब्धतेसंबंधी माहिती व समन्वय ठेवण्यासाठी वॉर रूम देखील कार्यरत आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती नाही.
वाढत असलेली रुग्ण संख्या पाहता महानगरपालिका हद्दीतील कोविड केअर सेंटर्समधील बेडची क्षमता वाढविण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जवळपास पाचशे बेड नव्याने निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून त्यातील साडेतीनशे बेड तरी या दोन-तीन दिवसांत उपलब्ध होतील यादृष्टीने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
हॉकी स्टेडियम येथील महापालिकेच्या इमारतीत १२५ बेडचे रुग्णालयच तयार होत असून त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. प्राधान्याने लहान मुलांसाठी हे रुग्णालय आरक्षित असेल. त्या ठिकाणी डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. दोन खासगी रुग्णालयांनी सुध्दा कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी मागितली आहे. ती प्रक्रिया देखिल सुरु असल्याचे उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितलते.
खासगी संस्थांकडून सेंटरची मागणी-
शहरातील काही सामाजिक संघटना, स्वयंसेवा संस्था यांनी महापालिकेकडे कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी मागितली आहे. जागा, अन्य साहित्य उपलब्ध करण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, त्यांच्याकडून डॉक्टर्स, नर्स उपलब्ध करुन देण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. त्यांची ही सूचना मान्य करण्यासारखी नाही. जर डॉक्टर्स, नर्स उपलब्ध झाल्या तर मग आम्हीच कोविड सेंटर्स वाढवू शकतो, असे उपायुक्त मोरे यांनी सांगितले.
घरात उपचार सुरूच होणार
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सर्वांना कोविड सेंटरमध्ये सामावून घेणे आणि त्यांच्यावर उपचार करण्याची क्षमता सध्या तरी महापालिका यंत्रणेची नाही, त्यामुळे यापुढेही सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरातच उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.
कुठे काय करणार?
शिवाजी विद्यापीठातील डीओटी सेंटर : २० ऑक्सिजन बेड
दुधाळी पॅव्हेलियन येथे ४३ ऑक्सिजनेटड व १५ सर्वसाधारण बेड,
राजोपाध्येनगरात ३२ ऑक्सिजनेटेड व १५ सर्वसाधारण
लक्षतिर्थ वसाहत कोविड सेंटरमध्ये २८ ऑक्सिजनेटेड बेड तयार आहेत. तेथे फक्त डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणार.