लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लाइन बाजार येथील घनकचरा प्रकल्प चालविण्यात ठेकेदार असलेल्या कोल्हापूर ग्रीन एनर्जी कंपनी असमर्थ ठरली असून, त्यांच्याशी झालेला करार महानगरपालिकेचा करार सहा महिन्यांसाठी स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घेतला. हा प्रकल्प उद्या (मंगळवार)पासून महापालिका आरोग्य विभाग स्वत: चालविणार आहे.
कोल्हापूर शहरातील ओला व सुका कचऱ्यावर दैनंदिन प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प ठेकेदाराने गेल्या दोन महिन्यांपासून बंद ठेवला आहे. कोल्हापूर ग्रीन एजन्सी या कंपनीने हा ठेका घेतला होता. परंतु, त्यांच्यासमोरील आर्थिक अडचणीमुळे तो बंद ठेवला होता. परिणामी गेल्या काही दिवसांपासून लाइन बाजार येथे कचरा टाकण्यास जागा शिल्लक नव्हती. रोज येणारा कचरा पोकलँड व डोझरच्या सहायाने ढिगावर ढीग रचून ठेवून तेथे जागा तयार केली जात होती.
‘लोकमत’मधून या संदर्भातील वृत्त शुक्रवारी (दि. १९ फेब्रुवारी) प्रसिद्ध करून या घनकचरा प्रकल्पाचे तीन-तेरा वाजल्याचे वास्तव समोर आणले होते. कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याची जाणीव करून दिली होती. शुक्रवारपासून सलग तीन दिवस महापालिकेला सुटी असल्याने प्रशासक डॉ. बलकवडे यांनी विधी विभागाला अभिप्राय देण्यास सांगितले होते. उपायुक्त निखिल मोरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांना या अभिप्रायावर आधारित प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते.
विधी विभागाच्या अभिप्रायानुसार जर ठेकेदाराने काही कारणांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद ठेवला तर सहा महिन्यांपर्यंत त्यांच्याशी झालेला करार स्थगित करून प्रकल्प महापालिका ताब्यात घेऊ शकते, अशी करारात अट असून, त्या अटीच्या आधारावरच सोमवारी सायंकाळी प्रशासक बलकवडे यांनी घनकचरा प्रकल्प ताब्यात घेण्याच्या प्रस्तावावर सही केली.
मंगळवारपासून हा प्रकल्प महानगरपालिका आरोग्य विभाग चालविणार आहे. त्यासाठी यासंदर्भातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. सध्या महानगरपालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत वेगवेगळ्या एजन्सीज नेमून छोटे प्रकल्प राबवित आहे. त्यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे.