कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर केल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेस गुरुवारी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते स्वच्छता प्रमाणपत्र देण्यात आले. स्वच्छता प्रमाणपत्र महापालिकेच्यावतीने आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्वीकारले. नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथे हा कार्यक्रम पार पडला. बुधवारी सायंकाळी पाच वाजता केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून महापौर हसिना फरास व आयुक्त पी. शिवशंकर यांना प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. महापौर काही कारणांनी या कार्यक्रमास जाऊ शकल्या नाहीत; पण आयुक्त शिवशंकर यांनी उपस्थिती लावून प्रमाणपत्राचा स्वीकार केला. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम कोल्हापूर महानगरपालिका हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. याबाबत राज्य तसेच केंद्र शासनाच्या समितीमार्फत कोल्हापूर शहराची आॅक्टोबरमध्ये पाहणी करण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त शहर करण्याचे उद्दिष्ट महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत चांगले काम केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचा प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता. तसेच हागणदारीमुक्त शहर व सेफ सिटी प्रकल्पासाठी कोल्हापूर महापालिकेस राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच स्मार्ट सिटी अवॉर्डने हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले होते.हागणदारीमुक्त शहर होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुरेशा प्रमाणात सार्वजनिक, सामुदायिक व पे अँड यूज तत्त्वावरील शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. तसेच खराब व नादुरुस्त शौचालये दुरुस्त करण्यात आली. झोपडपट्टी भागामध्ये खासगी संस्थांच्या सहभागातून तयार शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. नागरिकांनी उघड्यावर शौचास बसू नये, म्हणून विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर...अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर... महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यावर नेहमीच टीका होत असते. परंतु, मनावर घेऊन जाणीवपूर्वक काम केले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे केंद्र शासनाकडून झालेला हा गौरव आहे. हागणदारीमुक्त शहर अभियान राबविताना मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वच आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचाऱ्यांनी सहा महिने दररोजच्या कामाव्यतिरिक्त रात्री, तसेच पहाटेच्यावेळी अतिरिक्त काम करून संपूर्ण शहरात मुक्तीचे अभियान राबविले. देशभरात राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त केल्याबद्दल केंद्र सरकारतर्फे गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कोल्हापूर महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला. आयुक्त पी. शिवशंकर यांनी हा गौरव स्वीकारला. यावेळी केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड उपस्थित होते.
केंद्राकडून महापालिकेचा गौरव
By admin | Published: December 23, 2016 12:44 AM