कोल्हापूर : रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी उच्च न्यायालय, तसेच राष्ट्रीय हरित लवादाने टोकदार अंकुश लावल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने प्रदूषण रोखण्याच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. येत्या आठ दिवसांत बापट कॅम्प येथील नाला अडविण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे, तर कसबा बावडा येथील छत्रपती नाल्यावर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याकरिता जागा संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूर शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळून नदीचे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होत होत्या. इचलकरंजी शहरात काविळीसह अन्य साथींचे आजार पसरले होते. तरीही महानगरपालिका प्रशासन केवळ आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देत आपली जबाबदारी टाळत होती; परंतु गेल्या काही वर्षांत पंचगंगा नदी, तसेच रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचा वाद हा उच्च न्यायालय तसेच राष्ट्रीय हरित लवादाच्या कक्षात पोहोचल्यानंतर महानगरपालिका प्रशासनास खडे बोल सुनावण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम चांगलाच झाला असून, राज्य सरकारनेही अमृत योजनेतून ७२ कोटी ४७ लाखांचा निधी महापालिकेस दिला आहे. जयंती नाला पूर्णपणे रोखण्यास प्रशासनास यश आले असून, दुधाळी नालाही अडविण्याचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल. सध्या हे काम ७0 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. आता लाईन बाजार येथील छत्रपती नाला, तर बापट कॅम्प येथील नाला रोखण्याच्या कामास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. बापट कॅम्प नाला अडविणे तेथून पाणी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविणे या कामाची सुरुवात येत्या आठ दिवसांत होणार आहे. या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने काम केले नाही म्हणून फेरनिविदा काढून दुसऱ्या ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. ५अशी होईल सांडपाण्यावर प्रक्रिया दुधाळी नाला अडवून त्यातील सांडपाण्यावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करून पुन्हा नदीत ते सोडले जाणार आहे. बापट कॅम्प तसेच लाईन बाजार येथील नाल्यांचे सांडपाणी बंधारे व पंप हाऊस बांधून तेथून ते उचलले जाईल आणि हेच सांडपाणी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे आणले जाणार आहे. कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता ७५ एमएलडी इतकी असून, सध्या केंद्राकडे जयंती नाल्यातील ४० एमएलडी सांडपाणी वळविण्यात आले आहे.जागा संपादनाची प्रक्रिया सुरूलाईन बाजार येथील छत्रपती नाला अडविण्याकरिता जागा संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रि.स.नं. ९७२, ९७३ व ९५७ पैकी लगतच्या जागेतून येणारा हा नाला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून अडविला जाणार आहे. त्याकरिता २८७३ चौरस मीटर इतकी जागा संपादन करावी लागणार आहे. ना विकास व हरित क्षेत्रात असलेली ही जागा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या ‘कलम ३७’ प्रमाणे विकास आराखड्यात आरक्षित करणे आवश्यक आहे म्हणून तशी प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. यासंदर्भात होणाऱ्या फेरबदलांबाबत काही सूचना व हरकती असल्यास त्या एक महिन्याच्या आत देण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
प्रदूषण रोखण्याच्या कामांना महापालिकेचे आता प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2017 1:04 AM