कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक आता पुन्हा काही महिने पुढे ढकलली जाण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले हात आखडते घेतले आहेत. दिवाळीनंतर निवडणूक होणार या अपेक्षेने गणेशोत्सवासाठी इच्छुकांनी आपले हात सैल सोडले होते, त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या वर्गणीचा शब्द दिला होता. पण बुधवारी अचानक प्रभाग रचना बदलण्याच्या निर्णयामुळे इच्छुक उमेदवार अडचणीत आले.महानगरपालिकेच्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली होती. प्रभाग रचना, आरक्षण, मतदार याद्या तयार झाल्या होत्या. फक्त निवडणुकीची तारीख जाहीर व्हायची होती. त्यामुळे इच्छुकांनी आपले प्रभाग निश्चित करून प्रभागात येणाऱ्या सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घेत निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांतही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.इच्छुक उमेदवारांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या रकमेची वर्गणी देण्याचा शब्द दिला होता. त्याच्या जोरावर कार्यकर्त्यांनीही मोठ्या आवाजाची डॉल्बी, विद्युतरोषणाईसह आगमन-विसर्जन मिरवणुकीचे नियोजन दणक्यात सुरू केले होते. विशेष म्हणजे यंदा सरकार बदलल्यामुळे गणेशोत्सवावरील निर्बंध उठविले आहेत. कार्यकर्ते जोरात कामाला लागले होते. काही उमेदवारांनी मंडळांना वर्गणीही देऊन टाकली आहे. परंतु बुधवारी राज्य सरकारने महानगरपालिका सभागृहातील सदस्य संख्या कमी करण्यासह प्रभाग रचना, आरक्षण नव्याने टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उमेदवारांच्या गेल्या काही दिवसातील सर्व जोडण्यांवर पाणी फिरले आहे.
काही जण भलतेच हुशार..
काही मुरब्बी माजी नगरसेवकांनी आपले पत्ते अद्याप खोललेले नाहीत. निवडणूक जाहीर होऊ द्या, मग बघूया असे सांगून मंडळाच्या कार्यकर्त्यांना टाळताना दिसत आहेत. एकदा सोडून तीनवेळा निवडणुकीसाठी तयारी केली, आणि आता पुन्हा चौथ्यांदा काय वाढून ठेवलंय याचा अंदाज नसल्याने माजी नगरसेवकांनी शांत बसणेच पसंत केले आहे.