कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसह राज्यातील अन्य महानगरपालिकेच्या नजीकच्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कडक निर्बंध घातले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रचार पदयात्रा, घरोघरी प्रचार करण्यासह मतदान केंद्रातील व्यवस्था, मतमोजणीसंदर्भात स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत. ज्यांच्याकडून निर्बंधांचे उल्लंघन होईल, त्यांच्यावर कारवाईसुध्दा होणार आहे.महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याची तयारी पालिका प्रशासन तसेच राज्य निवडणूक आयोगाकडून जोरात तयारी सुरू आहे. पालिका प्रशासनाने प्रभागांचे प्रारूप आराखडे तयार करून आयोगास सादर केले आहेत. आता आयोगाकडून प्रारूप आराखडे जाहीर केले जाण्याची प्रतीक्षा आहे.एकीकडे प्रारूप आराखडे, आरक्षण प्रक्रिया कशाप्रकारे राबवायची यावर ठोस निर्णय होत असताना त्याही पुढे जाऊन आयोगाने प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यापासून मतमोजणी होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोणते नियम पाळायचे आहेत, कशाप्रकारे पाळायचे आहेत याचे सविस्तर पत्र महानगरपालिकेला पाठविले आहे.सर्वसाधारण नियम असे - निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व व्यक्ती, कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखणे अनिवार्य आहे.
- मतदान कक्षात काम करणाऱ्या सर्वांना दोन डोस घेणे आवश्यक. दोन डोस झाले नसतील तर ४८ तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक.
- मतदान केंद्रात प्रवेश करणाऱ्यांचे तापमान तपासणार. मतदान केंद्रात सामाजिक अंतर राखणे आवश्यक.
- शक्यतो मोठ्या हॉलमध्ये केंद्र सुरू करावीत. मतदान यंत्र हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्लोज आवश्यक.
नामनिर्देशन प्रक्रियाउमेदवारी अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. त्यानंतर त्याची प्रिंट निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहेत. यावेळी दोन व्यक्तींनाच प्रवेश देणार. बहुसदस्य प्रभाग असल्यास एका केंद्रावर मतदार संख्या ७०० ते ८०० असणार, एक सदस्य प्रभाग असल्याच एक हजार मतदार संख्या असणार.मतदारांचा थर्मल स्कॅनिंग होणार. मास्क नसल्यास केंद्रातून देण्याची सोय. पॉझिटिव्ह रुग्णांना शेवटच्या एक तासात मतदानाची परवानगी. मतमोजणी केंद्रातही हीच नियमावली असेल.प्रचार कसा करायचा? -राजकीय पक्ष, उमेदवारांना प्रचार कसा करावा याचेही नियम केले आहेत. पहाटे पाच ते रात्री ११ जमावबंदी असल्याने पाच लोकांना येण्यास प्रतिबंध असेल.मोठ्या जागेत ५० लाेकांच्या उपस्थितीत सभा घेण्यासाठी परवानगी आवश्यक. पदयात्रा, घरोघरी प्रचार करताना पाचपेक्षा कमी लोकांना परवानगी. मतमोजणीनंतर मिरवणूक काढण्यास बंदी असेल.