लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक बेमुदत पुढे ढकलण्यात आल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. आता ही निवडणूक कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतरच घेतली जाऊ शकते. राज्य सरकारने शुक्रवारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना प्रशासक म्हणून कामकाज पाहण्यास मुदतवाढ दिली. महानगरपालिकेची निवडणूक होऊन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत ही मुदतवाढ राहील.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत दि. १५ नोव्हेंबर २०२० ला संपली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने महापालिकेची होऊ घातलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आयुक्त असलेल्या डॉ. बलकवडे यांच्याकडेच प्रशासक म्हणून कार्यभार सोपविला गेला. प्रशासक म्हणून सहा महिन्यांसाठी ही नियुक्ती होती; परंतु दि. १५ मे रोजी ही मुदत संपणार असल्याने शुक्रवारी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने त्यांचा कार्यकाळ नवीन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढविला आहे.
प्रशासकांची मुदत वाढविल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूरसह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सगळी प्रशासकीय यंत्रणा कोरोना रोखण्याच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे ही निवडणूक ऑक्टोबर-नोंव्हेबरपर्यंत तरी होणे अशक्य आहे.