कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतली जाईल, असे अंदाज बांधून त्याची पूर्वतयारी सुरू असतानाच निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चर्चा सुरू झाली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक नोव्हेंबर २०२० मध्ये पुढे ढकलण्यात आली होती. आता कोरोनाला हद्दपार करण्याकरिता प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याने निवडणूक पुन्हा लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दि. १५ नोव्हेंबरपूर्वी होऊन नवनिर्वाचित सभागृह अस्तित्वात येणे अपेक्षित होते. परंतु मार्च २०२० मध्ये भारतात, राज्यात आणि कोल्हापुरात कोरोनाची साथ सुरू झाल्याने आणि सर्व शासकीय यंत्रणांचे कोरोनाशी मुकाबला करणे हेच सर्वोच्च प्राधान्य राहिल्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. दि. १५ नोव्हेंबर रोजी प्रशासक म्हणून डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हातात सूत्रे देण्यात आली.
आता राज्यातील कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात आली असून नवीन रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निवडणुकाही आता पूर्णत्वाकडे जात आहेत. दि. १५ जानेवारीस ही निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या की सरकार लगेचच फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात महापालिकेच्या निवडणुका घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. राज्य निवडणूक आयोगाची तयारीही त्या दिशेने सुरू झाल्याने या अंदाजाला बळकटी मिळाली.
परंतू, रविवारी सकाळी औषध नियंत्रक महासंचालकांनी देशात कोव्हॅक्सीन व कोव्हिशिल्ड या दोन लसींना आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली. त्यामुळे आता संपूर्ण देशभर कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्याची व्यापक मोहीम हाती घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील सर्व कर्मचारी तसेच आघाडीवर राहून कोरोनापासून बचाव करण्याच्या कार्यात भाग घेतलेल्या कोरोना योध्द्यांना ही लस टोचली जाणार आहे. त्यानंतर सामूहिक लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचे नियोजनही पूर्ण झाले आहे. मोहिमेत सर्व सरकारी यंत्रणा व्यस्त राहणार आहे. त्यामुळे पुढील चार-पाच महिने तरी महसूल, आरोग्य, पोलीस, महापालिका यंत्रणा याच कार्यात व्यस्त राहील. त्यामुळेच महापालिकेची निवडणूक पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.