विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असली, तरी ही निवडणूक मुदतीत होणार का हीच मुख्य संभ्रमावस्था आहे. परंतु, तरीही राजकीय पातळीवर हालचाली सुुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे संभाव्य चित्र पाहता राज्यातील सत्ताधारी तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविण्याचीच शक्यता जास्त आहे. भाजप-ताराराणी आघाडी त्यांच्या विरोधात सध्यातरी रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. हेच चित्र कायम राहिल्यास किमान चौरंगी लढत होऊ शकते.दोन्ही काँग्रेससह शिवसेनाही सध्या राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून कारभार करत आहे. गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या राजकारणातही हे तिन्ही पक्ष एकत्र होते. मागच्या (२०१५)च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना सत्तेत असतानाही त्यावेळी भाजपचा काटा काढायचा म्हणून शिवसेनेने भाजपची पाठराखण केली नाही.
सत्ताधारी पक्ष असल्याने मुख्यत: दोन्ही काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या जास्त राहील. त्या सर्वांना संधी द्यायची आणि प्रभाग पातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करायची म्हणून हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढू शकतात. त्यातून कार्यकर्त्याला संधी मिळते व आघाडी केल्यास आपल्याच पक्षाचा ताकदीचा उमेदवार विरोधी आघाडीला मिळू शकतो हा धोका टाळता येतो. त्यामुळे गेल्या निवडणुकीतही दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढल्या आणि निवडणूक झाल्यावर ते एकत्र आले. शिवेसनाही स्वतंत्रच लढली होती.आताही पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. तसा कोणताही समन्वय शिवसेनेच्या जिल्हा पातळीवर कोणत्याच नेत्याशी या दोघांचा नाही. गेल्या निवडणुकीत त्या पक्षाला कशाबशा चारच जागा मिळाल्या. त्यातील काही तर उमेदवाराच्या स्वत:च्या करिष्म्यावर मिळाल्या. विधानसभेला शिवसेनेचा पराभव झाला असला तरी निवडणुकीची सूत्रे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडेच राहतील असे चित्र आहे. पक्षांतर्गत बेदिली जास्त असल्याने शिवसेनेला सोबत घेण्यात अडचणीच जास्त आहेत.गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे तगड्या उमेदवारांची फळी होती. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होईल असा सर्वांचाच आणि त्यातही भाजप-ताराराणीच्या नेत्यांचा होरा होता. त्यांनी काँग्रेस व त्यातही तत्कालीन माजी आमदार सतेज पाटील यांना बेरजेतच धरले नाही. त्यांचा विधानसभेला कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात पराभव झाला होता.
त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांत काहीशी सहानुभूती होती आणि भाजपने व त्यातही महाडिक गटाने राष्ट्रवादी पुढच्या राजकारणात आपली डोकेदुखी ठरू नये यासाठी सगळी ताकद त्या पक्षाच्या प्रबळ उमेदवारांच्या विरोधात लावली. त्यात काँग्रेसकडे कुणाचे लक्षच गेले नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की, काँग्रेसला सर्वांत जास्त जागा मिळाल्या. राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. त्याचा फटका पुढे माजी खासदार धनंजय महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत बसला.हसन मुश्रीफ-सतेज पाटील केंद्रस्थानीराज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामध्ये हसन मुश्रीफ व सतेज पाटील हे मंत्री असल्याने ही निवडणूक त्यांच्याभोवतीच केंद्रिभूत होणार आहे. गेल्या निवडणुकीत सत्ता नसताना त्यांनी महापालिकेवरील वर्चस्व कायम राखले होते. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी हे संख्याबळ निर्णायक ठरत असल्याने पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ हे जोडण्या लावण्यात पुढे असतील.राजकारण असेही..दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढल्या तरी त्या पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगले अंडरस्टँडिंग असते. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या उमेदवारास चांगले पाठबळ मिळत आहे हे पाहून सगळी ताकद त्याच्यामागे लावली जाते. ज्या भागात विरोधी उमेदवारास चांगली मते मिळू शकतात, त्याच भागात ताकदीचा उमेदवार देऊन त्याची रसद तोडण्यासाठी म्हणूनही स्वतंत्र लढणे पथ्यावर पडते.महाडिकच केंद्रस्थानीगेल्या निवडणुकीत प्रत्येकी ४० जागा लढवून ताराराणीला २० आणि भाजपला १३ जागा मिळाल्या. त्यावेळी भाजप एकदम फॉर्मात होता. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सगळी ताकद उमेदवारांच्या पाठीशी असूनही भाजपला मर्यादित यश मिळाले. त्यामुळे यावेळेला भाजपपेक्षा ताराराणीकडे उमेदवारीसाठी जास्त गर्दी होऊ शकते. ताराराणीच्या पाठीशी महाडिक गटाचे नेटवर्क असते. त्याचा त्यांना फायदा होतो. माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजपमध्ये असल्याने त्या पक्षातील वजन वाढविण्यासाठी त्या पक्षाला चांगले यश मिळवून देण्याचा दबाव त्यांच्यावर राहील.निवडणूक होणार का याबाबतच संभ्रमनिवडणुकीची प्राथमिक तयारी अजून म्हणावी तशी झालेली नाही. महापालिकेने पत्र पाठविले म्हणून आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीवेळी १ जुलैला प्रभाग रचना तयार झाली होती. ३१ ऑक्टोबरला निवडणूक लागायची असेल तर ३१ ऑगस्टला आचारसंहिता लागायला हवी. कोरोनाच्या सोबतीला कोल्हापुरात महापुराचाही धोका असतो. गेल्या वर्षी महापालिकेची सगळी यंत्रणा त्यास राबली होती. यंदा पूर किती येणार हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे त्याचा विचार करता निवडणुका वेळेत होणार का याबाबतच संभ्रम आहे.
भाजप व ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची लवकरच बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भातील रणनीती निश्चित केली जाईल. निवडणूक एकत्रच लढण्याचा प्रयत्न राहील.स्वरूप महाडिक
प्रमुख ताराराणी आघाडी
सध्याचे बलाबल
- काँग्रेस : २७
- राष्ट्रवादी : १५
- ताराराणी आघाडी : १९
- भाजप : १३
- शिवसेना : ०४
- अपक्ष : ०३(त्यातील दोघांचा काँग्रेसला व एकाचा ताराराणी आघाडीस पाठिंबा)