कोल्हापूर : महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे उद्या, गुरुवारी पगार होणार असून याबाबतच्या प्रस्तावावर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सही केली. या निर्णयाबद्दल कर्मचाऱ्यांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला, तर बलकवडे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
राज्य सरकारने घालून दिलेल्या अटी पूर्ण करण्याच्या हमीवर सातवा वेतन लागू करण्याचा करार महापालिका कर्मचारी संघ व प्रशासन यांच्यात झाला होता. जुन्या थकबाकीच्या पन्नास टक्के व चालू मागणीच्या नव्वद टक्के वसुली झाली पाहिजे अशा अटी घालण्यात आल्या होत्या. कर्मचाऱ्यांना दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले नसले तरी जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे प्रशासक बलकवडे यांनी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार करण्याचे आदेश दिले.
पगाराची तारीख उलटून बारा तेरा दिवस झाले तरी पगार न झाल्यामुळे कर्मचारी अस्वस्थ होते. मंगळवारी सायंकाळी अचानक सुमारे ५०० ते ६०० कर्मचारी महापालिका विठ्ठल रामजी शिंदे चौकात जमले होते. जर प्रशासकांनी सही केली नाही तर उद्यापासून संप करण्याचा त्यांच्या विचार होता. कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसलेही चौकात थांबले होते. कोणतीही चर्चा अथवा शिष्टमंडळ न भेटता सायंकाळी सात वाजता प्रशासकांनी प्रस्तावावर सही केल्याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळाली आणि आंदोलानऐवजी साखर वाटण्याचा निर्णय घेतला.
फोटो क्रमांक १६०२२०२१-कोल-केएमसी एम्लॉई
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी मंगळवारी महापालिका चौकात जमले होते. छाया : नसीर अत्तार