कोल्हापूर : जुन्या वेतनश्रेणीने पगार अदा करायचा की नवीन वेतनश्रेणीने अदा करायचा, याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असून, कदाचित सोमवारी महानगरपालिकेचे पगार होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पगाराचा गुंता शुक्रवारीही कायम राहिला. प्रशासक पुण्याला गेल्यामुळे त्यांची सही झालेली नाही. त्यामुळे आता सोमवारी पगार होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगानुसार पगार करण्यास राज्य सरकारची मंजुरी झाली आहे. परंतु ही मंजुरी देताना सरकारने काही अटी घालून दिलेल्या आहेत. त्या अटी कर्मचारी संघाने मान्य केल्या आहेत. परंतु पहिल्याच महिन्यात ठरवून दिलेल्या उद्दिष्टाइतकी वसुली झाली नाही. तसेच महागाई भत्त्याचाही विषय प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे प्रशासक बलकवडे यांनी पगारवाढीच्या प्रस्तावावरच सही केलेली नाही.
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देताना आधीच आर्थिक ओढाताण होणार असल्याने महागाई भत्ता यावेळी देणे जवळपास अशक्य आहे. कर्मचारी संघासदेखील ही अडचण मान्य आहे. त्यांना नवीन पगारवाढीसाठी महागाईभत्त्याचा विषय ताणून धरलेला नाही. त्यामुळे सोमवारी सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.