कोल्हापूर : शहरात विविध कारणांकरिता महापालिका प्रशासनाने अनेक हॉल (सभागृह) बांधले आहेत. नागरिकांना समारंभ, कार्यक्रमासाठी कमी भाड्यांमध्ये यातील काही हॉल उपलब्ध होतात. तसेच अनेक हॉलमध्ये सकाळी व सायंकाळी बॅडमिंटनचे खेळाडू सराव करतात; पण येत्या सहा महिन्यांत होणाऱ्या निवडणुका सोप्या होण्यासाठी इस्टेट व विभागीय कार्यालयाच्या साथीने नगरसेवकांनी हे हॉल व्यावसायिक तत्त्वावर भरणाऱ्या स्पर्धांना मोफत देण्याचा सपाटाच लावला आहे. या फुकट्यांना आयुक्त पी. शिवशंकर यांनी चाप लावावा, अशी मागणी खेळाडंूतून होत आहे.शहरातील जवळपास सर्वच मोठ्या मैदानाजवळ महापालिकेने बॅडमिंटन हॉलसह इतर बहुउद्देशीय हॉल बांधले आहेत. कोणत्या हॉलचा कशासाठी वापर करावा, हे ठरलेले आहे. इस्टेट विभागाचे दुर्लक्ष व विभागीय कार्यालयाचा वरदहस्त यामुळे हे हॉल फुकट्या स्पर्धा आयोजकांची आवडती ठिकाणे बनली आहेत. या फुकट्या आयोजकांमुळे स्थानिक खेळाडूंना मनस्ताप सहन करावा लागत आहे, तर मनपाचे वीज-पाणी वापरून नागरिकांच्या पैशावर डल्ला मारला जात आहे. यास परिसरातील नगरसेवकांची साथ मिळत असल्याने प्रशासनही बघ्याची भूमिका घेताना दिसते.कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान येथे सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत विविध टप्प्यांत परिसरातील अनेक खेळाडू बॅडमिंटनचा सराव करतात. याचे रीतसर भाडेही हे खेळाडू मनपाकडे भरतात. मात्र, खेळाडूंना माहिती न देताच हॉलमध्ये परस्पर कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये कॅरम स्पर्धा, ज्यूदो व कराटे स्पर्धा, आदी पाचशे रुपयांपासून हजार रुपये प्रवेश फी आकारून आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांचाही समावेश आहे. आठ-आठ दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमुळे संपूर्ण हॉल हा तळीरामांचा अड्डाच बनतो. कोपरे अन् कोपरे पान-तंबाखूने माखून जातात. यानंतर महापालिका प्रशासन स्वच्छतेसाठी पुढाकारही घेताना दिसत नाही. अशा फुकट्यांना आवरण्याची मागणी खेळाडूंतून होत आहे. (प्रतिनिधी)येणाऱ्या निवडणुकीवर परिसरातील महापालिकेचे हॉल भागातील तरुण मंडळे तसेच व्यापारी तत्त्वावर स्पर्धा भरविणाऱ्यांकडून निव्वळ पैसे उभारण्यासाठी आयोजित के ल्या जाणाऱ्या स्पर्धांना मोफत उपलब्ध करून देण्यात नगरसेवकांच्या साथीने प्रशासन पुढाकार घेत आहे. एरवी सर्वसामान्यांसाठी नियमांवर बोट ठेवणारी मनपा बघ्याची भूमिका घेत हक्काच्या मिळकती फुकट्यांना वापरण्याची मुभा देत असल्याने नागरिक व खेळाडूंत नाराजीचा सूर आहे.
मनपाचे हॉल फुकट्यांना आंदण
By admin | Published: March 23, 2015 12:02 AM