कोल्हापूर : विनापरवाना कोविड रुग्ण दाखल करून त्याची महापालिकेला माहिती न देता उपचार केल्याबद्दल येथील साई होम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला महानगरपालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी गुरुवारी नोटीस बजावली. नोटीस मिळाल्यापासून चोवीस तासांत खुलासा केला नाहीत तर कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटीसद्वारे दिला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने या रुग्णालयाची बुधवारी पाहणी केली तेंव्हा तेथे कोविड रुग्णांवर उपचार होत असल्याचे तसेच त्याकरिता परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले होते. परवानगीशिवाय रुग्णालय सुरू ठेवल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
भाजपचे शाहूपुरी मंडल अध्यक्ष आशिष कपडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, परवानगी न घेता कोविड रुग्णांवर उपचार केल्याबद्दल महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या दारात जाऊन भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला, तर रुग्णालयाचे डॉ. राहुल गणबावले यांनी भाजप कार्यकर्त्यांवर सेटलमेंटसाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला होता.