कोल्हापूर : तांत्रिक अधिकारी असूनही अतांत्रिक कामे करतोय. हाताखाली कर्मचारी नाहीत. एक अभियंता वीस वीस प्रभागातील कामे पाहतोय. मागणी केली तरी अभियंत्यांची पदे भरली जात नाहीत. विभागीय कार्यालय स्वतंत्र केलीत पण पूरेशी यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत कामांची गती वाढवणार कशी? अशा शब्दात महानगरपालिकेतील अभियंत्यांनी मंगळवारी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासमोर आपली गाऱ्हाणी मांडली.महापालिका आयुक्त कार्यालयात मंगळवारी आमदार जाधव यांनी शहरातील विकास कामाबाबत आढावा बैठक घेतली. अधिकारी कामे करत नाहीत, कामाची गती नाही. उपशहर अभियंता कामाचे योग्य नियोजन करत नाहीत, अशी टिपणी आमदार जाधव यांनी बैठकीत केली. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनातील अवस्वस्थतेला वाचा फुटली.शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी, उपशहर अभियंता कार्यक्षम आहेत, पण त्याच्याकडे पुरशे कर्मचारी नाहीत, अभियंते नाहीत. एक अभियंता वीस वीस प्रभागाचे काम करतोय, याकडे लक्ष वेधले. अभियंत्यांची संख्या वाढविली पाहिजे यावरही सरनोबत यांनी जोर दिला. उपशहर अभियंता रमेश मस्कर, हर्षजित घाटगे यांनी याचा प्रश्नावर आम्ही काम बंद आंदोलन केले होते याची जाणीव करुन दिली.आमदार जाधव यांनी मनुष्यबळ वाढवावेच लागेल, असे सांगितले. महापालिकेत अत्यावश्यक अशा किती कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत याचा एक आढावा घेऊन माझ्याकडे प्रस्ताव द्या. ज्या विभागात जास्त कर्मचारी आहेत, तेथील कमी करुन ते कमी असलेल्या विभागात वर्ग करा, अशी सूचना करत प्रभारी आयुक्त आंधळे यांना तशा दृष्टीने कर्मचाऱ्यांचे आॅडीट करण्याच्या सूचना दिल्या.